सुंदर माझा दवाखाना; बीड जिल्हा रूग्णालय राज्यात अव्वल, पटकावले लाखाचे बक्षिस
By सोमनाथ खताळ | Published: January 31, 2024 09:50 PM2024-01-31T21:50:39+5:302024-01-31T21:51:15+5:30
तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ११ उपकेंद्रांनाही मिळाले बक्षिस
बीड : सुंदर माझा दवाखाना या कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरावरून आरोग्य संस्थांची तपासणी करण्यात आली होती. यात कायाकल्प चेकलीस्टच्या आधारावर जिल्हा रूग्णालय राज्यात प्रथम क्रमांकावर आले असून एक लाख रूपयांचे बक्षिसही पटकावले आहे. यासोबतच तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ११ उपकेंद्रालाही बक्षिसे मिळाली आहेत.
७ एप्रिल २०२३ या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरावरून आरोग्य उपकेंद्र, आरोग्य केंद्र, उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालये, जिल्हा रूग्णालय यांची तपासणी करण्यात आली होती. राज्यस्तरीय समितीने याची तपासणी केल्यानंतर बीड जिल्हा रूग्णालयाला सेवा, सुविधांमध्ये ९८ टक्के गुण मिळाले. त्यामुळे जिल्हा रूग्णालय राज्यात पहिल्या क्रमांकावर राहिले. त्यांना आता १ लाख रूपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. सोबतच घाटनांदूर, राजेगाव आणि कडा आरोग्य केंद्रालाही प्रत्येकी २० हजार रूपये बक्षिस मिळणार आहे. वाघाळा, आष्टा (हरिनारायण), तळेगाव, कोळपिंप्री, पाचेगाव, मस्साजोग, हारकी लिंबगाव, नागदरा, दासखेड, खोकरमोहा आणि चिंचाळा या उपकेंद्रांनाही प्रत्येकी १० हजार रूपये बक्षिस दिले जाणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडाळ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एल.आर.तांदळे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रौफ शखेख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.संजय कदम, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.अमृता मुळे, समन्वयक डॉ.जयश्री दराडे, सहायक बापू निकाळजे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले होते.