लोकाभिमुख प्रशासन निर्मितीसाठी ‘सुंदर माझे कार्यालय’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:32 AM2020-12-31T04:32:25+5:302020-12-31T04:32:25+5:30
बीड जिल्हा परिषदेत कार्यशाळा बीड : ‘सुंदर माझे कार्यालय’ अभियानामुळे सुधारणा व उत्साहवर्धक वातावरण निर्माण होईल, असे मत बुधवारी ...
बीड जिल्हा परिषदेत कार्यशाळा
बीड : ‘सुंदर माझे कार्यालय’ अभियानामुळे सुधारणा व उत्साहवर्धक वातावरण निर्माण होईल, असे मत बुधवारी येथील जिल्हा परिषदेच्या कार्यशाळेत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील ‘सुंदर माझे कार्यालय’ या कार्यालयाच्या सर्वांगीण सुधारणांबाबतच्या अभियानाची सुरुवात उपआयुक्त (आस्थापना) सुरेश बेदमुथा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना उपआयुक्त सुरेश बेदमुथा यांनी अभियानाचा उद्देश, अभियानात करावयाची स्वच्छतेची कामे, कार्यालयीन सुधारणा, लोकाभिमुख कार्यपद्धती इ. बाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार म्हणाले की, जिल्हा परिषदेत कर्मचारी कल्याण अभियान पूर्वीपासूनच राबविले जात असून, त्याद्वारे प्रलंबित कामकाजाचा निपटारा जलदगतीने करणे शक्य होत आहे, तसेच जिल्हा परिषदअंतर्गत कार्यालयांना कार्यालयीन कामकाजात सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी सूचना दिलेल्या असून, सुधारणेच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. ‘ सुंदर माझे कार्यालय’ अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद मनापासून प्रयत्न करीन आणि लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासन निर्माण होण्यासाठी त्यामुळे मदत होईल, असे ते म्हणाले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी शासकीय कार्यालय हे स्वत:चे घर समजून कार्यालयात स्वच्छता राखण्याचे व चांगले कामकाज करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, दत्तात्रय गिरी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जटाळे, तसेच जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख व गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी आभार मानले.
लोकाभिमुख प्रशासन निर्माण करता येईल
शासकीय कर्मचारी हे त्यांच्या दैनंदिन वेळेच्या एकतृतीयांश वेळ कार्यालयात असतात. या वेळेत त्यांनी शासकीय कार्यालय हे माझे कार्यालय आहे, या भावनेने काम केल्यास कार्यालयीन कामात शिस्त, नीटनेटकेपणा येऊन कार्यालयीन सुधारणा होतील व काम करण्यास उत्साहवर्धक वातावरण निर्माण होईल. अभियानाद्वारे शासकीय कार्यालयात स्वच्छता, कार्यालयीन कामकाजात आधुनिकीकरण, प्रलंबित कामांचा जलदगतीने निपटारा करणे शक्य होऊन लोकाभिमुख प्रशासन निर्माण करता येईल, असा विश्वास उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी कार्यशाळेत व्यक्त केला.