बीडमध्ये राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष रेखा फड यांच्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:13 AM2018-06-05T01:13:51+5:302018-06-05T01:13:51+5:30
बीड : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन नौकरी घालवण्याची धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडीची जिल्हाध्यक्ष रेखा फड यांच्यासह सात महिलांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता हा प्रकार घडला. यापूर्वीही रेखा फड यांनी पोलिसांविरोधात भाष्य केले होते.
राष्ट्रवादीची जिल्हाध्यक्ष रेखा फड यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ते ९ महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डिझेल - पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन करीत होत्या. यावेळी फड यांनी मुख्य प्रवेशद्वारावरच चूल पेटवण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाºयांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसास शिवीगाळ करुन, तू मला ओळखत नाहीस, तुझी नौकरी सांभाळ. मी तुझी नौकरी घालवून टाकीन. तू कोण मला अडवणारा ? मी माझे आंदोलन येथेच करीन, अशा भाषेत धमकी देऊन पोलिसांच्या अंगावर त्या धावल्या. प्रसंगावधान राखत महिला पोलिसांनी या सर्व आंदोलककर्त्या महिलांना अटक करुन शिवाजीनगर ठाण्यात हजर केले. पोलीस नाईक आशिष वडमारे यांच्या फिर्यादीवरुन रेखा फड यांच्यासह बेबी भिकाजी रणसिंग, नंदा वामन सारुक, सुनीता बन्सी नवले, लतिका अरुण काळे, सीमा जीवन बुगडे, तारामती चंद्रसेन लाड यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा तसेच इतर कलामान्वये शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यापूर्वीही फड यांच्यावर गुन्हा
काही महिन्यांपूर्वी सिद्धीविनायक कॉम्प्लेक्समधील एका जाहीर सभेत रेखा फड यांनी केजच्या पोलीस निरीक्षकांवर वेगवेगळे आरोप केले होते. पोलिसांनी त्यानंतर तात्काळ रेखा फड यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. एक पूर्ण दिवस स्थानिक गुन्हे शाखेत बसविले होते. आंदोलन करताना त्यांनी पुन्हा पोलिसांना शिवीगाळ केली.