उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतराचे बीड कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 08:18 AM2021-06-30T08:18:12+5:302021-06-30T08:19:04+5:30
इरफान खाजाखा पठाणला दिल्लीत अटक
डाॅ. जे. एन. शेख
सिरसाळा (जि. बीड) : उत्तर प्रदेशातील कथित बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाच्या सिरसाळा कनेक्शनमुळे बीड जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. सिरसाळ्यातील मूळ रहिवासी आणि दिल्लीत नोकरी करत असलेल्या इरफान खाजाखा पठाणला (३५) उत्तर प्रदेश पोलिसांनी दिल्लीत अटक केली आहे. इरफानसोबत मौलाना जहांगीर व उमर गौतम यांना अटक केली आहे.
इरफान पठाण बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा गावचा असून, त्याचे प्राथमिक शिक्षण सिरसाळ्यात झाले. त्यानंतर त्याचे माध्यमिक शिक्षण परळीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. उच्च माध्यमिक शिक्षण वैद्यनाथ महाविद्यालयात झाले. बारावीनंतर तो मुंबईला शिक्षणासाठी गेला. चार वर्षांपासून तो केंद्र सरकारच्या चाईल्ड वेल्फेअरमधील साईन लँग्वेजसाठी दिल्लीत काम करत होता. इरफान असं काही करू शकत नाही. समाज माध्यमातूनच आम्हाला माहिती मिळाल्याचे इरफानचा भाऊ फुरखान पठाण यांनी सांगितले. इरफानला आई, दोन मोठे भाऊ आहेत.
चाइल्ड वेल्फेअरच्या कामाचे कौतुक
काही महिन्यांपूर्वी अहमदाबाद येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इरफान खाजाखा पठाण याला उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाबासकी देत पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या.