बीड जिल्ह्यात कोवळ्या कळ्यांवर वासनांधतेची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:38 AM2018-04-21T00:38:58+5:302018-04-21T00:38:58+5:30
बीड जिल्ह्यात गतवर्षी तब्बल ३२ अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे गुन्हे पोलीस ठाण्यात नोंद आहेत, तर पोक्सो अंतर्गत जिल्ह्यात ७१ गुन्ह्यांची नोंद आहे. या आकडेवारीवरुन जिल्ह्यात आजही महिला असुरक्षित असल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : वेगवेगळे आमिष दाखवून ओळखीचेच लोक अल्पवयीन मुलींवर अत्याचार करीत असल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. जिल्ह्यात गतवर्षी तब्बल ३२ अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे गुन्हे पोलीस ठाण्यात नोंद आहेत, तर पोक्सो अंतर्गत जिल्ह्यात ७१ गुन्ह्यांची नोंद आहे. या आकडेवारीवरुन जिल्ह्यात आजही महिला असुरक्षित असल्याचे दिसून येते. त्यांच्या मनात आजही ‘भय’ कायम असल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार कोवळ्या वयातच मुलींना वासनांधतेला बळी पडावे लागत आहे.
जम्मू काश्मीरमधील कटुआ व उन्नाव येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांनी देश हादरुन टाकला. त्यानंतर बीडसह देशात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. मूक मोर्चे काढून यातील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. एवढेच नाही तर महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणीही मोर्चातून झाली. हा सर्व प्रकार डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्याची परिस्थिती पाहिली असता २०१७ या वर्षात तब्बल ७१ गुन्हे पोक्सोअंतर्गत विविध ठाण्यांमध्ये दाखल असल्याचे समोर आले.
पोलिसांकडून जनजागृती
पोलीस प्रशासनाने महिला व मुलीच्या संरक्षणासाठी जिल्ह्यात १२ दामिनी पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकाच्या माध्यमातून छेडछाड करणाऱ्यांसह महिला व मुलींना त्रास देणाºयांवर कारवाई केली जाते. तसेच शाळा, महाविद्यालयात जाऊन घ्यावयाच्या काळजीसंदर्भात मुलींना मार्गदर्शन व शिक्षिकांना सूचना केल्या जातात. त्याचे पालन करण्याचे आवाहन दामिनी पथकातर्फे होते.
परिचितांकडूनच भीती
दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये बहुतांश आरोपी हे ओळखीचेच आहेत, तर काही गुन्ह्यांमध्ये नातेवाईकच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विश्वास ठेवायचा कोणावर असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आपली मुलगी एखाद्या व्यक्तीबरोबर पाठविताना, बोलताना व एकटी घरी असताना तिच्याशी वारंवार संपर्क करणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा घटनांना नक्कीच आळा बसेल असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोक्सो कायद्यात लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणे, विनयभंग करणे, पळवून नेणे, छेडछाड करणे यांचा समावेश आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यांवरुन जिल्ह्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना कमी होत नसल्याचे दिसून येते. या घटना रोखण्यासाठी महिला व मुलींनी तसेच त्यांच्या पालकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे.
तीन महिन्यात ११७ कारवाया
पोलीस अधीक्षकांनी नियुक्त केलेल्या दामिनी (जिल्हा) या पथकाने मागील तीन महिन्यात ११७ कारवाया केल्या आहेत. पथकात पोलीस उपनिरीक्षक भारत माने, एस. एस. गर्जे, आर. जी. सांगळे, एस. ए. जाधवर, जयश्री घोडके, पी. आर. राठोड, व्ही. बी. राठोड यांचा समावेश आहे.
या आकडेवारीवरुन जिल्ह्यात आजही मुलींची छेड काढली जात असल्याचे दिसून येते. या घटना रोखण्यासाठी दामिनी पथकाने आणखी सक्रिय होणे गरजेचे आहे. बीड तालुक्यात पोलीस उपनिरीक्षक मनीषा जोगदंड या दामिनी पथकाचे काम पाहत आहेत. ११ तालुक्यांमध्ये ११ पथके कार्यरत आहेत.