उपसंचालकांनी केले बीड जिल्हा रूग्णालयाचे ‘आॅपरेशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:06 AM2019-06-04T00:06:55+5:302019-06-04T00:07:54+5:30
लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी सोमवारी अचानक जिल्हा रूग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व रूग्णालयाचा आढावा घेण्याबरोबरच डॉक्टरांची हजेरी घेतली.
बीड : लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी सोमवारी अचानक जिल्हा रूग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व रूग्णालयाचा आढावा घेण्याबरोबरच डॉक्टरांची हजेरी घेतली. दांडी बहाद्दरांवर तात्काळ कारवाई करून आरोग्य सेवा व स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याचे आदेश माले यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले. उपसंचालकांनी अचानक येऊन ‘आजारी’ रूग्णालयाचे ‘आॅपरेशन’ केल्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
जिल्हा रूग्णालयातआल्यावर बाह्य रूग्ण विभागात तात्काळ व तत्पर सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उपसंचालक डॉ.माले यांनी सोमवारी अचानक सर्व बाह्यरूग्ण विभागाची तपासणी केली. नेहमीप्रमाणे अस्थि व बालरोग विभागातील डॉक्टर गैरहजर होते. रूग्णांच्या बाहेर लांबच लांब रांगा होत्या.
त्यानंतर त्यांनी सर्वच विभागात जावून आढावा घेण्याबरोबरच रूग्ण व नातेवाईकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. आलेल्या तक्रारींचे तात्काळ निरसन करून तात्काळ व दर्जेदार सेवा देण्याचे आदेश डॉ.माले यांनी आरोग्य प्रशासनाला दिले. यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.सतीश हरिदास, मेट्रन खैरमोडे यांची उपस्थिती होती.
दरम्यान, डॉ. माले यांच्या भेटीच्या जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर कितपत परिणाम होतो, हे येणारी वेळच ठरविणार आहे. परंतु सोमवारी दिलेल्या अनेक आश्वासनांनी सर्वसामान्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. आता याची तत्काळ अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.