१ जानेवारीला बीड जिल्ह्यात राहणार तगडा बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 08:00 PM2018-12-06T20:00:09+5:302018-12-06T20:01:46+5:30
जादा बंदोबस्तही मागविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
बीड : गतवर्षी कोरेगाव भिमा प्रकरणाचे पडसाद जिल्ह्यासह राज्यभर उमटले होते. यावर्षी पुन्हा तसा प्रकार होणार नाही, यासाठी बीडपोलिसांनी नियोजन करणे सुरू केले आहे. त्यासाठी १ जानेवारीला बीडमध्ये तगडा बंदोबस्त असणार आहे.
१ जानेवारीला कोरेगाव भिमा येथे समाजबांधव येथील विजयस्तंभाला आदारांजली अर्पन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने गर्दी करीत असतात. गतवर्षी किरकोळ कारणावरून मोठा वाद उफाळून आला होता. याचे पडसाद राज्यभर उमटले. बीड जिल्ह्यातही जाळपोळ, दगडफेक असे प्रकार घडले होते. अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांनी हे प्रकरण शांत केले होते.
यावर्षीही जिल्ह्यात समाजबांधवांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमाला बंदोबस्त देण्याबरोबरच जिल्हाभर सुरक्षा वाढविण्यात येणार आहे. तसेच जादा बंदोबस्तही मागविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्याकडून सर्व उपविभागीय पोलीस अधिका-यांसह ठाणे प्रमुखांची बैठक घेतली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
प्रत्येक विभागात होणार बैठक
प्रत्येक ठाण्यात समाजबांधवांना आणि विविध संघटनांच्या पदाधिका-यांना बोलावून बैठक घेतली जाणार आहे. तसेच त्यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन करण्याबरोबरच विविध सुचना केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील संवेदनशिल ठिकाणी विशेष बंदोबस्त असेल. तसेच या भागात गस्तही असणार आहे.
पोलिसांना सहकार्य करावे
१ जानेवारीला बंदोबस्त मागविणार आहोत. तसेच ठाणे प्रमुखांना आतापासूनच बैठका घेण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनाही बोलावून घेत सुचना केल्या जातील. पोलिसांना सहकार्य करावे. काही संशयास्पद वाटल्यास तात्काळ पोलिसांना संपर्क करावा.
- जी.श्रीधर, पोलीस अधीक्षक, बीड