बीड : जिल्ह्यातील महिलांना पुरूषांपेक्षा जास्त टेन्शन असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय कुटूंब सर्वेक्षणातून समोर आली आहे. महिलांचे आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष आणि कामाचा वाढता ताण हे याची मुख्य कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महिलांनी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
उच्च रक्तदाबाचे एकूण प्रमाण महिलांमध्ये २६.४ टक्के आहे तर पुरूषांमध्ये २४.१ टक्का आहे. तसेच गंभीर उच्च रक्तदाब हा महिलांमध्ये जास्त आहे. जिल्ह्यातील प्रमाण महिलांमध्ये ८ तर पुरूषांमध्ये ५.९ टक्के एवढे आहे. पुरूषांपेक्षा १.१ टक्का जास्त प्रमाण महिलांमध्ये आहे. सौम्य रक्तदाबात मात्र पुरूष पुढे आहेत. महिलांमध्ये १५ तर पुरूषांमध्ये १६.९ टक्के एवढे आहे. प्रत्येकाने वर्षातून एकवेळा आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.
उच्च रक्तदाब वाढण्याचे कारण
मासिक पाळी चालू असेपर्यंत स्त्री संप्रेरकांचे सरंक्षण असते. परंतु, ती बंद होताच ते संरक्षण नाहीसे होते. तसेच महिलांचे आजार लवकर समोर येत नाहीत. अंगावर काढले जातात. त्यामुळे उपचारात अडचणी येतात.
काय काळजी घ्यावी?
थोडही थकवा, तणाव अथवा इतर आजार जाणवले तर तात्काळ जवळच्या आरोग्य संस्थेत जावून वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. दुखणे अंगावर काढल्यास इतर आजारांनाही निमंत्रण मिळते. अनेक आजार ताप, सर्दी, खोकला यांच्यासारखे दिसत नाहीत. त्यामुळे वारंवार आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे.
दुखणे अंगावर काढू नये
महिलांमध्ये उच्च रक्तदाब वाढण्यास मासीक पाळीचेही कारण आहे. तसेच महिला आजारी असल्या तरी लवकर रुग्णालयात जात नाहीत. त्यामुळे तो आजार शोधून उपचार करणे कठीण बनते.
- डॉ.संजय कदम, एडीएचओ, बीड