बीड : दिव्यांगांचा तीन टक्के निधी तात्काळ वाटप करावा, या मागणीसाठी गुरूवारी प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमो आंदोलन करण्यात आले. यावेळी निवेदन देण्याच्या कारणावरून पोलीस - आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला तर रस्त्यात थांबलेल्या आंदोलकांना आपण बााजुला थांबण्याची विनंती केल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.
जिल्हा व तालुका पातळीवर १८ नोव्हेंबर २०१५ अन्वये समितीची स्थापना करावी, निसमर्थ व्यक्तींच्या विविध प्रवर्गातील चार निसमर्थ सदस्य या समितीत घ्यावेत, दिव्यांगांना देण्यात येणारे मानधन एक हजार रूपये करावे, निराधार, निरश्रीत व दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेंतर्गत सहभागी करून घ्यावे, यासारख्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आगोदर आंदोलकांना रस्त्यातून बाजूला होण्याची विनंती केली. परंतु आंदोलक शांत झाले नाहीत.
रस्त्यातून बाजूला घेण्याच्या कारणावरून पोलीस व आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आंदोलकांनी एकच गोंधळ घातला. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला. तसेच याबाबत संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना निलंबीत करावे, अशी मागणीही आंदोलकांनी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, सहायक पोलीस निरीक्षक सतिष जाधव यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मिळालेल्या माहितीनुसार या आंदोलनाची शिवाजीनगर पोलिसांना माहिती देण्यात आलेली नव्हती. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची ठाण्यात नोंद झालेली नव्हती.
संतप्त आंदोलकांकडून पोलिसांना शिवीगाळपोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलनास बसलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला घेऊन रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. याच वेळी काही आंदोलकांनी संतप्त होत घोषणाबाजी केली.
पोलिसांनी त्यांना शांततेचे आवाहन केले. परंतु त्याचा फायदा झाला नाही. त्यांना बाजूला घेतले असता आपल्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.आंदोलन चिघळत असल्याचे लक्षात येताच काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु इतरांनी विनंती केल्यानंतर त्यांना खाली उतरवले. त्यानंतर मात्र त्यांनी पोलिसांनी शिवीगाळ केल्याचे सूत्रांनी सांगितले.