लोकमत न्यूज नेटवर्कबीड : स्थानिक पातळीवर सर्व प्रकारचे प्रमाणपत्र तसेच महसूल सेवांबाबतचे प्रमाणपत्र मिळण्याची सोय असलेले जिल्ह्यातील ११ सेतू सुविधा केंद्र मुदत संपल्याने जिल्हा स्तरावरील समितीने बंद केले आहेत. एकीकडे हे केंद्र बंद झाले असले तरी नागरिकांच्या सेवेत आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत राहणार आहेत. या पुढे प्रमाणपत्र आता गावातच मिळण्याची सोय झाल्याने सेतू केंद्रात होणारी लूट आपोआप थांबली आहे.
बीड जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ग्रामीण भागातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्राप्त करावे लागत होते. मात्र हक्काच्या प्रमाणपत्रांसाठी दलालांच्या गर्दीमुळे त्रास सहन करण्याबरोबरच आर्थिक भुर्दंड सहन करण्याबरोबरच विलंब लागत होता.
सर्व प्रमाणपत्रे गावपातळीवरच आॅनलाईन पध्दतीने मिळावीत म्हणून महा ई सेवा केंद्र कार्यरत होते. १९ जानेवारपर्यंत २०५ महा ई- सेवा केंद्र जिल्ह्यात सुरु होते. त्यानंतर शासन निर्णयानुसार हे प्रमाणपत्र आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून देण्याबाबत सूचना आल्या. त्यानुसार जिल्हाभरात आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या. हे केंद्र चालविण्यासाठी प्रतिसादही मिळत गेला. जिल्ह्यात सध्या ७३४ आपले सरकार सेवा केंद्र होते. शासन सूचनेनंतर २०५ महा ई सेवा केंद्र्र आपले सरकार सेवा केंद्रात वर्ग झाले. त्यामुळे सध्या जिल्ह्यात ९९० आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत आहेत.थेट लाभ घेता येतो२५ हजार २३९ जणांनी आपले सरकार सेवा केंद्राशी थेट संपर्क साधून सेवांचा लाभ घेतला आहे. या पोर्टलवर गेल्यानंतर आपली प्रोफाईल करुन पुढील प्रक्रिया करता येते.