- सोमनाथ खताळ
बीड : न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आरोपींचे स्वॅब घेण्यासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात आणले. परंतू येथे स्वॅब घेण्यात उशिर झाल्याने पोलिसांचा पारा चढला. यात एका पोलीस अधिकाऱ्याने फोनवरून आयसोलेशन वॉर्डच्या इन्चार्जला उद्धट भाषा वापरल्याचे समजते. आता या प्रकरणात पोलीस न्यायालयात तर आरोग्य विभाग जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देणार असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या दोन योद्धांमध्ये हे ‘युद्ध’ लागण्याची शक्यता आहे. यात वेळीच तोडगा काढून वाद मिटविण्याची गरज आहे. या सर्वप्रकरणात परिचारीका मात्र आक्रमक झाल्या आहेत.
सध्या कोरोनाविरूद्ध लढा देण्यात आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन सर्वात पुढे आहेत. यावर उपाययोजना व काळजी म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने कोणताही आरोपी कारागृहात घेण्यापूर्वी त्याची कोरोना तपासणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे विविध गुन्ह्यात असलेल्या ९ आरोपींना न्यायालयीन कोठडी झाली होती. त्यांची रूटीन आरोग्य तपासणी करून त्यांना स्वॅब घेण्यासाठी आयसोलेशन वॉर्डमध्ये नेण्यात आले. पावणे आठच्या सुमारास त्यांची तेथे नोंद झाली. नेहमीच्या वेळेप्रमाणे म्हणजेच ९ वाजता त्यांचे स्वॅब घेणे अपेक्षित होते. परंतु रात्री ११ वाजले तरी कोणीच स्वॅब न घेतल्याने पोलीस चिडले. त्यांनी संबंधितांना संपर्क केला. परंतु त्यांना कोणीही प्रतिसाद दिला नाही.
यावर एक पोलीस उपनिरीक्षक थेट कक्षात गेले. त्यांनी याबाबत विचारणा केली. याचवेळी येथील स्टाफने इन्चार्जला ही कॉल करून ही माहिती दिली. त्या दोघांमध्ये बोलणे सुरू असतानाच त्यांनी खात्री करून घेण्यासाठी कॉलमॅनकडे फोन देण्यास सांगितले. त्यांचा संवाद सुरू असतानाच या उपनिरीक्षकांनी फोन घेतला. अॅडमिट करणे व डिस्चार्ज करण्यावरून ते चिडले. शेवटी महिला कर्मचाऱ्याला त्यांच्याकडू अपशब्द गेला. समोरून तात्काळ हा फोन कट करण्यात आला. त्यानंतर हा सर्व प्रकार संबंधित महिला कर्मचाऱ्याने वरिष्ठांना सांगितला आहे. आता यावर कारवाई सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणात डॉक्टर जे सांगतील, तेच परिचारीका करीत असतात. यातही डॉक्टरांच्या सुचना काहीच नसल्याने परिचारीकांना पोलिसांना उत्तर देता आले नाही. डॉक्टर सुटले आणि राग परिचारीकांवर निघाला, अशी चर्चा आहे. यात आता उशिर करणारे डॉक्टर आणि रागावणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार की हे प्रकरण आपसात मिटणार हे वेळच ठरवेल.
डॉक्टरांनी आरोपींबाबत गांभीर्याने घेण्याची गरजकोणताही आरोपी हा घातक असतो. त्यामुळे त्यांची रूटीन तपासणी असो व स्वॅब घेणे, यावर गांभीर्याने विचार करून तात्काळ कारवाई करणे अपेक्षित असते. रात्रीच्या प्रकरणात या आरोपींचे स्वॅब उशिरा ११ वाजेनंतर घेण्यात आले आहेत. दिवसभर धावपळ केलेल्या पोलिसांचा यामुळे पारा चढला. इकडे उशिर झाला तर कारागृहात आरोपींना प्रवेश देतील की नाही? असा प्रश्न पोलिसांसमोर असतो. अनेकदा रात्रभर आरोपींना सांभाळावे लागते. यात आरोपी पलायन करणे, हल्ला करणे असे अनेक प्रकार घडतात. त्यामुळे यात काळजी घेण्याची गरज आहे.
न्यायालयात अहवाल देणाररात्रीच्या प्रकरणात आरोपींना खुप वेळ बसवून ठेवण्यात आले. कायदा आणि सुरक्षेच्या दृष्टीने हे चुकीचे आहे. पोलिसांना अनेक अडचणी असतात. यात उशिर झाल्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांना त्यांना केवळ विचारणा केली. आता या सर्व प्रकरणाचा न्यायायालयात अहवाल देणार आहोत. रूटीन तपासणीलाही अनेकदा डॉक्टर सहकार्य करीत नाहीत.- विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, बीड
आयसोलेशन वॉर्डमध्ये येऊन एका महिला कर्मचाऱ्याला उद्धट बोलणे चुक आहे. हा गंभीर प्रकार आहे. काही अडचण असेल तर वरिष्ठांना बोलायला हवे होते. याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना पत्र देणार आहोत. - डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक बीड