बीड : जिजाऊ मल्टीस्टेट प्रकरणात बबन शिंदे हा मुख्य आरोपी आहे. त्याला अटकेसह इतर तपास करण्यासाठी 'एसआयटी' स्थापन केलेली आहे. यात तपास अधिकारी हे बीडचे उपअधीक्षक विश्वांभर गोल्डे हे असून मार्गदर्शक छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचा पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे एसीबीसमोर हजर झाला असून या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांचीही पोलिस खात्यासह एसीबीकडून चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिजाऊच्या गुन्ह्यात आरोप न करण्यासाठी पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे याने एक कोटी रूपयांची लाच मागितली होती. सहायक फौजदार आर.बी.जाधवर याने प्रोत्साहन दिल्यानंतर पाच लाख रूपये व्यापारी कुशल जैन याच्याकडे देण्यास सांगितले होते. याप्रकरणी एसीबीने बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, जिजाऊच्या गुन्ह्यात खाडेमुळे तपास संथगतीने झाला. एवढेच नव्हे तर ठेविदारांनी आंदोलने, मोर्चे काढूनही मुख्य आरोपी बबन शिंदे याला अद्यापही अटक केली नाही. दिवसेंदिवस ठेविदार आक्रमक होत असल्याने आणि घोटाळ्याची व्याप्ती अधिक असल्याने या प्रकरणात एसआयटी स्थापन केली होती. यामध्ये बीडचे उपअधीक्षक विश्वांभर गोल्डे हे मुळ तपास अधिकारी होते. खाडे हा सहायक होता. त्यानंतर अपर पोलिस अधीक्षक हे एसआयटीचे प्रमुख तर महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा हे मार्गदर्शक होते. एवढे सर्व वरिष्ठ अधिकारी असतानाही खाडे याने १ कोटी रूपये लाच मागण्याची हिंमत केली. अखेर तो गुरूवारी पाेलिसांसमोर स्वत:हून हजर झाला आहे.
तक्रारदाराला शाखेत आणून मारहाणकारवाई होण्याआगोदर हरिभाऊ खाडे याने तक्रारदाराला आर्थिक गुन्हे शाखेत बोलावून घेतले. त्यानंतर त्याला सर्वांसमोर मारहाण केली. तसेच तक्रारदाराचे वडील पोलिस असल्याने वडिलांवरही घालून बोलले. हाच त्रास असह्य झाल्याने एसीबीकडे तक्रार केली आणि खाडेसह तिघे जाळ्यात अडकले.
बबन शिंदे अटक का नाही?या प्रकरणातील मुख्य आरोपी बबन शिंदे हा मागील अनेक महिन्यांपासून फरार आहे. ठेविदारांनी आंदोलन करूनही आणि एसआयटी नेमून उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी तपासासाठी देऊनही शिंदे अटक नाही. शिंदेला अटक न करण्यासाठी लाच घेतल्याचा आरोपही ठेविदारांनी करत एसआयटीवर प्रश्न उपस्थित केला आहे.
एलसीबीचे पथकही शांतचशिंदेला अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक मुरकुटे यांचे एक स्वतंत्र पथक नियूक्त केलेले आहे. परंतू ते देखील शांतच आहे. तपास अधीकारी असलेले विश्वांभर गोल्डे, शोध पथक आणि खासकरून आर्थिक गुन्हे शाखाच शांत असल्याने ठेविदारांचा संशय आणखीनच वाढत चालला आहे. 'मॅनेज' झाल्यानेच शिंदेला अटक केली जात नसल्याचा आरोप ठेविदारांनी केला आहे.
बीडचे उपअधीक्षक गोल्डेही अडचणीतया गुन्ह्याचे तपास अधिकारी बीडचे उपअधीक्षक विश्वांभर गोल्डे हे देखील या प्रकरणात अडचणीत आले आहेत. कारण जिजाऊच्या प्रकरणातच सहायक असलेल्या खाडेने तब्बल एक कोटी रूपये मागितले आहेत. वरिष्ठांचे 'पाठबळ' असल्याशिवाय त्याने एवढी हिंमत केलीच कशी? असा सवाल ठेविदारांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात गोल्डे यांचीही एसीबी आणि पोलिस खात्यांतर्गत चौकशी केली जाणार असल्याचे एसीबीतील सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, गोल्डे यांची निवृत्ती वर्षभरावर आलेली असतानाच ते या लाचेच्या प्रकरणात अडकण्याची दाट शक्यता आहे. याबाबत त्यांना वारंवार कॉल केले, परंतू त्यांनी फोन न घेतल्याने याप्रकरणात गोल्डे यांची बाजू समजली नाही.