औरंगाबाद : जन्मत:च सुरू झालेला ‘क्रांती’चा संघर्ष अखेर संपला. बाळ बदल झाल्याच्या संशयातून डीएनए अहवालानंतरही ‘ती’ला नाकारणाऱ्या आई-बाबाचे मनपरिवर्तन करण्यात समाजसेविकांना यश आले. त्यामुळे मंगळवारी सकाळी ११ वाजता ही चिमुकली पुन्हा आईच्या कुशीत दिसेल.
छाया राजू थिटे (रा. भंडारी, ता. सेनगाव, जि. हिंगोली, ह.मु. कुप्पा ता.वडवणी, जि. बीड) या महिलेने ११ मे रोजी सायंकाळी ४.४५ वाजता या चिमुकलीला जन्म दिला. त्याची नोंद प्रसुती विभागात चुकून मुलगा अशी केली. वजन कमी असल्याने बाळाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्याला इतरत्र हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार एका खाजगी रूग्णालयात दाखल केले गेले. १० दिवस उपचार केल्यानंतर २१ मे रोजी बाळाला आईच्या स्वाधीन केले. परंतु, मुलगा नसून तीे मुलगी असल्याचे समजताच आईने स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पोलिसांनी बाळाचे व थिटे दाम्पत्याचे रक्त घेऊन डीएनए तपासणीसाठी पाठविले. त्याचा अहवाल प्राप्त होताच ते बाळ थिटे यांचेच असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा रुग्णालयातील परिचारिका व डॉक्टरांच्या लिहिण्यातील चुकीमुळे हा गोंधळ उडाल्याचे तपासातून समोर आले. तब्बल १२ दिवस आईच्या दूधापासून दुरावलेले हे बाळ शुक्रवारी दुपारी थिटे दाम्पत्याच्या स्वाधीन करण्यात आले. रात्रभर त्याचा सांभाळ केल्यानंतर शनिवारी सकाळी १० वाजता या दाम्पत्याने बाळाला सांभाळण्यास आपण असमर्थ असल्याचा जबाब बालकल्याण समितीसमोर दिला.
समितीचे अध्यक्ष डॉ.अभय वणवे, सदस्य तत्वशील कांबळे, सुनिल बळवंते यांनी त्यांचे समुपदेशन केले. मोठ्या प्रयत्नानंतरही बाळ स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. अखेर बाळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने समितीने त्या बाळाला सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शनिवारी दुपारी १२ वाजता औरंगाबादेतील भारतीय समाज सेवा केंद्रात आणण्यात आले होते.
२१ दिवसांची ही चिमुकली आई-बाबा असताना आणि स्वत:चे घरही असताना अनाथ झाल्याने समाजमन ढवळून निघाले होते. तिला पुन्हा आईची माया मिळावी यासाठी केंद्रातील समाजसेविका प्रयत्नशील होत्या. याचसाठी ‘क्रांती’च्या आई-बाबाचे शुक्रवारी समुपदेशन करण्यात आले. मोठ्या प्रयत्नानंतर त्यांचे मनपरिवर्तन करण्यात यश आले. आई-वडिलाने क्रांतीला स्वीकारण्याची तयारी दाखविली असून मंगळवारी सकाळी ११ वाजता ते तिला घेऊन जाणार असल्याचे केंद्राच्या प्रमुख वसुधा जातेगावकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.