केज (बीड) : येथील खरेदी विक्री संघाच्या शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर शेतमाल प्रति क्विंटल अकरा किलो अधिक घेतल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. यावरून पणन संचालकांनी याबाबतच्या चौकशीस आज सुरुवात केली. कोल्हापूर येथील विषेश लेखा परिक्षकाची एक समिती ही चौकशी करत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील खरेदी विक्री संघाच्या मार्फत शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर शेतकर्यांच्या मालाचे वजन केंद्राने एका खाजगी साखर कारखान्याच्या वजन काट्यावर केली. यातून शेतकर्यांचा हरभरा प्रति क्विंटल मागे अकरा किलो अतिरिक्त घेतला तसेच हमालीसुद्धा जास्त घेतली जात असल्याची तक्रार काही शेतकर्यांनी सहायक निबंधक कार्यालयात केली.
या तक्रारीची चौकशी जिल्हा निबंधकांच्या आदेशानुसार सहाय्यक निबंधक कार्यालयात सुरु होती. याबाबत आ सुरेश धस यांनी दखल घेऊन अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पणन राज्य मंत्री व पणन संचालक यांच्याकडे केली. यानंतर पणन संचालकांनी तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली. कोल्हापूरचे विशेष लेखा परीक्षक वर्ग -१ यांच्या मार्फत या चौकशीस आज सुरवात करण्यात आली. विशेष लेखा परीक्षक जी व्ही निकाळजे यांनी शेतकर्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या.