अंबाजोगाई - इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीला क्रीडास्पर्धेसाठी नेऊन तिची छेडछाड करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाने जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापतनेकर यांच्या न्यायालयाने तो जामीन अर्ज फेटाळला.
अंबाजोगाई शहरातील एका नामांकित विद्यालयातील क्रीडा शिक्षकाने जालना येथे झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी इयत्ता नववीतील विद्यार्थीनीला नेले होते. स्पर्धेहून परत आल्यानंतर शाम दिगांबर वारकड या शिक्षकाने क्रीडासंकुलाच्या मैदानावर स्वत:च्या कारमध्ये त्या विद्यार्थीनीवर अत्याचार केल्याप्रकरणी अंबाजोगाई पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून कलम ३५४ अ (१), कलम ३७६ (१) (एफ), ५०६ भादंवि व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला. ही घटना १७ डिसेंबर रोजी घडली होती. या शिक्षकाला १८ डिसेंबर रोजी अटक झाली. त्यावेळी पासून तो शिक्षक आजतागायत गजाआड आहे.
तीन दिवसांपूर्वी त्या शिक्षकाच्या वतीने न्यायालयाकडे जामीनअर्ज दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी या जामीनअर्जावर सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील लक्ष्मण फड यांनी पीडितेची भक्कम बाजू मांडली. सरकारी वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून त्या क्रीडा शिक्षकाचा जामीनअर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायाधीश एस. एस. सापतनेकर यांनी जामीन अर्ज फेटाळला. जामीन अर्ज फेटाळल्याने त्या शिक्षकाचा कारावास वाढला आहे.