घोडका राजुरी तलावात मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जनावरं चारण्यासाठी गेलेल्या काही लोकांना पाण्यात तरंगत असलेला एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती घोडका राजुरी गावचे सरपंच सचिन घोडके यांना दिली. त्यांनी ही माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्यास कळवली. त्यानंतर ठाणेप्रमुख सपोनि शरद भुतेकर, पोउपनि खरात, सफौ. खरात, पोह इंगळे, पोकॉ. कारले, शेख यांनी घटनास्थळी पंचनामा केला. तसेच सरपंच सचिन घोडके यांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. शवविच्छेन करण्यासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून, मृताची ओळख रात्री उशिरापर्यंत पटलेली नव्हती. मृत व्यक्तीच्या खिशात एका पोकलेनचालकाचे कार्ड मिळाले होते. तसेच एका महिलेचा मोबाइल नंबर मिळाला होता. त्यावरून संपर्क करून घटनेची माहिती महिलेस दिली; मात्र संबंधित महिलेकडून मृताची ओळख पटवण्यासाठी येण्यास नकार मिळाला होता. त्यानंतर महिला पोलिसांकडून त्या महिलेची समजूत घालण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
घोडका राजुरी तलावात आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:34 AM