माजलगाव (बीड ) : शहरातील एका तरुणीचे आई-वडिलांनी येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न लावले. माञ, येतीजाती कार्यक्रमा दरम्यान विवाहितेने माहेरी न जाता प्रियकराचे घर गाठले. शेवटी हे प्रकरण शहर पोलीस ठाण्यात गेल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून मिटवले.
छञपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवसेवाभावी संस्था व लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरात २२ फेब्रुवारीस सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. यात केसापुरी वसाहत येथील एका तरुणीचे लग्न औरंगाबाद येथील युवकासोबत झाले. यानंतर सासरी गेलेली तरुणी येतीजाती कार्यक्रमासाठी माहेरी परतली. मात्र,आई-वडिलांकडे न जाता तिने प्रियकराचे घर गाठले.
याची माहिती मिळताच तरुणीच्या नातेवाईकांनी प्रियकराचे घर गाठले. तोपर्यंत तरुणी व तिच्या प्रियकराने माजलगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये पोहोंचले. तरुणीचे नातेवाईक येथे आले असता प्रियकराने आमचे काही दिवसांपूर्वीच नोंदणी पध्दतीने लग्न झाल्याचे पुरावे सादर केले. यानंतर पोलिसांनी प्रियकर व तरुणीचे लग्न ग्राह्य धरले. यामुळे तरुणीच्या नातेवाईकांना माघार घ्यावी लागली. या साऱ्या प्रकारची आज शहरात चांगलीच चर्चा आहे.
जबरदस्तीने विवाह लावण्यात आला
प्रियकरासोबत या पुर्वीच नोंदणी पध्दतीने विवाह केला आहे. आईवडील व अन्य नातेवाईकांनी नंतर जबरदस्तीनेच सामुहिक विवाह सोहळ्यात माझा दुसरा विवाह लावला. - नवविवाहिता