२२ पोलिसांवर ५९ गावांचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:33 AM2021-07-31T04:33:36+5:302021-07-31T04:33:36+5:30
सिरसाळा ठाण्यात १८ पदे रिक्त, प्रशासनाचे दुर्लक्ष सिरसाळा : परळी तालुक्यातील सर्वात मोठे असलेल्या सिरसाळा पोलीस ठाण्यात एकूण ...
सिरसाळा ठाण्यात १८ पदे रिक्त, प्रशासनाचे दुर्लक्ष
सिरसाळा : परळी तालुक्यातील सर्वात मोठे असलेल्या सिरसाळा पोलीस ठाण्यात एकूण एक सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षकांसह ४० पोलीस कर्मचारी पदे मंजूर आहेत. असे असताना केवळ २२ पोलीस कर्मचाऱ्यांवर ५९ गावांचा कारभार असल्याने अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे.
अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. याशिवाय फक्त ११ गावांमध्येच पोलीस पाटील कार्यरत असल्याने इतर गावांचा भार सिरसाळा पोलिसांवरच असल्याने पोलीस प्रशासनाने त्वरित रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.
मागील काही दिवसांपासून सिरसाळा पोलीस ठाण्यांतर्गत गंभीर प्रकारचे गुन्हे घडत असून अपुरे मनुष्यबळ असल्याने तपास करताना पोलिसांच्या नाकी नऊ येत आहे. सिरसाळा गावाची लोकसंख्या २५ हजाराच्या आसपास असून याशिवाय सिरसाळासह चार बीट अंतर्गत पोहनर, मोहा, मोहखेड, पिंपळगाव गाढे मधील ५९ गावांचा कारभार केवळ २२ कर्मचाऱ्यांना सांभाळण्याची वेळ आली आहे. अतिरिक्त कामाच्या ताणामुळे पोलिसांना कुटुंबाला वेळही देता येत नाही. गावातील जवळपास ४७ पोलीस पाटील पदे सुध्दा रिक्त आहेत. पूर्वी गावात काही तक्रार आल्यास पोलीस पाटील सुध्दा पुढाकार घेत असत. बहुतांश गावात पोलीस पाटील नसल्यामुळे सर्व काही ताण पोलिसांवरच येत आहे.