बीड: मागच्या निवडणुकीत कंत्राटदारांनी अधिक दर लावून लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत गैरप्रकार होऊ नये, यासाठी सूचना देणारे परिपत्रक निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ यांनी काढले आहे. वस्तू, सेवा, साहित्य याबाबतची मागणी करण्यासाठीची कार्यपद्धती अवलंबिण्याच्या सूचना सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या आहेत. गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज व परळी विधानसभा मतदारसंघ यांना आवश्यक असलेल्या वस्तू, सेवा, साहित्याचा पुरवठा ई-निविदेद्वारे निवड झालेले यशस्वी निविदाधारकांमार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास पुरवठादार यांनी त्यांचे एक नोडल उपलब्ध करून दिले आहे. त्यासाठी साहित्य व इतर सेवा पुरवठा वितरणासाठी व अभिलेख्यासंदर्भातील कार्यपद्धती अवलंबिण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व मतदारसंघातील कामकाज सुरू आहे. यात काही गैर प्रकार झाला तर त्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित नोडल अधिकारी जबाबदार राहतील, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
कोणकोणत्या दिल्या सूचना ?निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ यांनी विविध सूचना केल्या आहेत. निवडणूक कामकाजासाठी आवश्यक तेवढेच साहित्य संबंधित पुरवठाधारकांकडून योग्य त्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून घ्यावे, साहित्याचा अनावश्यक साठा करू नये. पुरवठादाराने नमूद केलेल्या प्रती तास, दैनंदिन व मासिक दर विचारात घेऊन या दरापैकी किफायतीशीर दराने व शासकीय रकमेची बचत होईल, अशा रितीने पुरवठा आदेश द्यावेत. मंडप, बॅरिकेटिंग, विद्युत संच मांडणी, सीसीटीव्ही कॅमेरे व इतर साहित्य मोजमाप सक्षम शासकीय अधिकारी यांच्याकडून त्या-त्यावेळी करून घ्यावे. भोजन, नाष्ट्याकरिता गरजेनुसार कूपन पद्धतीचा वापर करावा. वाहनांचे वाटप करताना त्याची नोंद ठेवावी, यासह इतर सूचना देण्यात आल्या आहेत.
...तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जबाबदारपुरवठादार यांच्याकडून तोंडी स्वरुपात साहित्य घेऊ नये. अशा प्रकारे पुरवठादार यांच्याकडून घेण्यात आलेल्या साहित्याच्या बिलाची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अदा करण्यात येणार नाही. तसेच त्या सर्व देयकाची जबाबदारी घेतली जाणार नाही. अवास्तव मागणीच्या खर्चास सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किंवा नोडल अधिकारी जबाबदार राहतील, अशी सक्त सूचना निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ यांनी दिली आहे.
अधिकारी घेत आहेत काळजीमागच्या निवडणुकीत अधिकाऱ्यांवर घोटाळ्याचे आरोप झाले होते. त्यामुळे लोकसभा निवडणूक अधिकारी ताकही फुंकून पीत असल्याचा अनुभव कंत्राटदारांसह कर्मचाऱ्यांना येत आहे. त्यामुळे यावेळी घोटाळ्याची शक्यता नसेल, असेही बोलले जात आहे.