दीपक नाईकवाडे
केज : तिहेरी हत्याकांड खून बलात्कार ,भ्रष्टाचाराने सरते वर्ष गाजले तर मांजरा धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरल्याने तीन बीड ,लातूर ,उस्मानाबाद जिल्ह्यातील गावांचा पाणी प्रश्न सुटला. २०२० हे वर्ष तालुकावासियांसाठी सुख -दुःख देणारे ठरले.
केज तालुक्यासाठी २०२० या वर्षाची सुरवात चांगली झाली. मात्र त्यानंतर कोरोनामुळे नागरिकांना तीन महिने घरात थांबावे लागल्याने अनेकांचे व्यवसाय बंद झाले. २ एप्रिल रोजी केज पोलिसात मुख्याध्यापक असलेल्या पित्याने पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पित्यासह आई व भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर मांगवडगाव येथे जमिनीच्या वादातून बाबू पवार ,प्रकाश पवार ,संजय पवार यांच्या तिहेरी हत्याकांडाने तालुका हादरून गेला. मेमध्ये तालुक्यातील १५ गावांत पाणी टंचाई निर्माण झाली. केज नगर पंचायतवर प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांची नेमणूक झाली. १८ जुलै रोजी लाडेगावमध्ये अनैतिक संबधाच्या कारणाने बाबासाहेब लाड यांचा खून करण्यात आला होता. केज पंचायत समितीमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत केलेल्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याने बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींची २० पथक स्थापन करून चौकशी सुरू केली. तर महिलांचे खून व इतर विविध गुन्ह्यांमुळे तालुक्यातील गुन्हेगारी अधोरेखित झाली.
लातूर ,उस्मानाबाद
जिल्ह्यातील गावांना पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण २८ ऑक्टोबररोजी पूर्ण क्षमतेने १४ व्या वेळी भरल्याने तालुका वासियांसाठी हा क्षण आनंददायी होता. कोरोनाच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झाल्याने मनसेने महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे यासाठी महिलांचा मोर्चा काढून सरकार दरबारी आवाज उठविला. सुकळी येथील शेतकऱ्यांनी जमिनीच्या मावेजासाठी रस्ता खोदून अनोखे आंदोलन केले. लाडेगाव येथे गायरान जमीवरील अतिक्रमण तहसीलदारांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले.
२०२० या वर्षात तालुक्यातील नागरिकांनी लॉक डाऊनच्या काळात माणुसकी जिवंत ठेवली. गरिबांना अन्न धान्य व लागणारी मदत करत व्यक्ती व सामाजिक संघटनांनी माणुसकीचे दर्शन घडवले. २०२० हे वर्ष तालुका वासियांसाठी एका डोळ्यात अश्रु तर दुसऱ्या डोळयांत हसू घेऊन आल्याचे ठरले.