माजलगाव : कुठलीही वैद्यकीय परवानगी नसताना तालुक्यातील मोगरा गावात रुग्णांवर उपचार करणाऱ्या आकाश विवेक विश्वास या बोगस डॉक्टरवर बुधवारी दिंदुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील मोगरा येथे एक इसम कुठलीही वैद्यकीय परवानगी नसताना रुग्णांना उपचार करत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुकर घुबडे यांनी गंगामसला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या मोगरा गावांत कारवाई करावी, असे बजावल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप बटुळे यांनी बुधवारी नायब तहसीलदार अशोक भंडारे, आरोग्य सहायक पी. एम. जगनाडे या पंचांसमक्ष मोगरा गावांत एका खोलीची झडती घेतली असता, तेथे आकाश विश्वास हा इसम रुग्णांवर उपचार करताना आढळून आला. त्यास मेडिकल कौन्सिलची परवानगी असलेली कागदपत्रे मागितली असता, ती नसल्याचे त्याने सांगितले. या ठिकाणी अलोपॅथी औषध, इंजेक्शन व रुग्ण तपासणीचे साहित्य असे ३५ हजार रुपयांचे साहित्य मिळून आले. त्याचा पंचनामा करून दिंदृड पोलीस ठाण्यात विश्वास यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.