सैनिकी विद्यालयामध्ये "लष्कर दिन" साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:37 AM2021-01-16T04:37:43+5:302021-01-16T04:37:43+5:30
बीड : सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बीड येथे शुक्रवारी "लष्कर दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, ...
बीड : सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बीड येथे शुक्रवारी "लष्कर दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, अशी माहिती सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य एस.ए. डाके यांनी दिली.
लष्करी पद्धतीचे शिक्षण देणारे व सैन्यात अधिकारी व्हावेत, देश सेवेची आवड युवकांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी जिल्ह्यातील एकमेव सैनिकी विद्यालय बीड येथे लष्कर दिनाचे आयोजन केले होते. नवगण शिक्षण संस्था राजुरी (न.) संचलित सैनिकी विद्यालयांमध्ये लष्करी पद्धतीचे शिक्षण दिले जाते. शुक्रवारी लष्कर दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य डाके तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक मेघराज कोल्हे, एफ. एम. गायकवाड, विजयकुमार धारणकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये लष्कर दिन कार्यक्रम पार पडला. मान्यवरांच्या हस्ते शहीद जवानांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भारतीय लष्कराबद्दल व त्यांच्या अलौकिक कार्याबद्दल आपल्या भाषणांमधून माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डाके यांनी भारतीय लष्कराच्या अनेक विजयी गाथा सांगताना भारतीय लष्कराच्या शौर्याबद्दल मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांमध्ये सैन्य दलाबद्दल आकर्षण व प्रेरणा निर्माण केली. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित माजी सैनिकांनी सैन्यातील आपले अनुभव यावेळी सांगितले.
सूत्रसंचालन उद्धव काशीद सर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह सर्व प्राध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.