थोरले देवघर संस्थानच्या नावे फेरफार, सातबाऱ्यावर तत्काळ नोंदी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:21 AM2021-07-23T04:21:19+5:302021-07-23T04:21:19+5:30
अखिल भारतीय मराठा महासंग्राम महिला आघाडीचे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन मराठा महासंग्राम महिला आघाडीचे अंबाजोगाईत बेमुदत धरणे आंदोलन ...
अखिल भारतीय मराठा महासंग्राम महिला आघाडीचे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन
मराठा महासंग्राम महिला आघाडीचे अंबाजोगाईत बेमुदत धरणे आंदोलन
अंबाजोगाई : येथील दत्तात्रय देवस्थान थोरले देवघर संस्थानच्या नावे फेरफार व सातबाऱ्यावर तत्काळ नोंदी घ्याव्यात, या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय मराठा महासंग्राम महिला आघाडीच्या वतीने गुरुवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या प्रकरणी अखिल भारतीय मराठा महासंग्राम महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ॲड. स्वाती राम लोमटे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, दत्तात्रय देवस्थान थोरले देवघर या संस्थानची जमीन अंबाजोगाईतील काही लोकांनी संगनमताने अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस आदेश तयार केला. ही जमीन स्वतःच्या नावे फेरफार व सातबाऱ्यावर नोंदी करून रजिस्ट्री केल्याचे निदर्शनास आले असल्यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून हा घोटाळा जनतेच्या व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यामुळे राज्याचे मुख्य सचिव, बीड जिल्हाधिकारी व बीडचे भूसुधार उपजिल्हाधिकारी यांनी आदेश काढून सर्व फेरफार व सातबाऱ्यावरील नोंद रद्द करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने अंबाजोगाईचे अप्पर जिल्हाधिकारी यांनी १४ जुलै रोजी दोन्ही वकिलांचे म्हणणे ऐकून घेत फेरफार क्र. ३१४३५, ३१७३९ व ३१७४० हे रद्द केले असल्याचा निर्णय दिला.
सदरील निकालाआधारे सदरील लोकांच्या नावे झालेले फेरफार, रजिस्ट्री तत्काळ रद्द झाले पाहिजे होते. परंतु, अंबाजोगाईचे तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी हे प्रकरण गांभीर्याने घेत नसून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सदरील लोकांना सहकार्य करीत असल्याचे निदर्शनास येत असल्याने त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कार्यवाही होणे गरजेचे आहे. तसेच बोगस आदेश काढणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही झाली असून इतर आरोपी मात्र अजूनही मोकाट फिरत आहेत. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
220721\2052-img-20210722-wa0101.jpg
अंबाजोगाई येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे