मागील दोन वर्षात पाऊसप्रमाण चांगले राहिल्याने उसाचे क्षेत्र वाढले. त्यामुळे कारखान्याला ऊस पाठविण्यासोबतच अनेकांनी स्वत:चे गु्ऱ्हाळ सुरू केले आहेत. तर काही गुऱ्हाळ मालक इतर ठिकाणाहून उसाची खरेदी करीत आहेत. त्यामुळे गुळाचे उत्पादन वाढल्याने ४० ते ६० रूपये किलोच्या दरात स्थिरावला आहे. संक्रातीला गुळाची मोठी मागणी असते. मागील दोन महिन्यांपासून साखरेचे दरही स्थिर आहेत. कारखान्यांकडे मागील वर्षीच्या गाळप हंगामातील उत्पादीत साखरेचा साठा शिल्लक असल्याने व सध्या कारखाने सुरू असल्याने दृष्टीपथातील उत्पादन लक्षात घेत साखरेचे दर स्थिर आहेत.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अनेक शेतकरी घरगुती तसेच विक्रीच्या दृष्टीने तिळाचे उत्पादन घेतात. गावरान तिळाला चांगली मागणी असते. बाजारात गावरान स्वच्छ केलेला तीळही पॅकबंद पाकिटात उपलब्ध आहे. चांगल्या प्रतीच्या तिळाची गुजरातमधून आयात होते. साखरतीळ बीड, औरंगाबाद, नगरच्या बाजारपेठेतून येतो.
गुळाचा गोडवा
सैंद्रिय गुळाला मागणी आहे. त्याचबरोबर चिक्कीचा गुळ बाजारात आला आहे. मागील वर्षी गुळाचे भाव ५० ते ६० रूपये किलो होते. यंदा ४५ ते ५५ रूपये किलो भाव आहेत. चिक्की गुळ मात्र किलोमागे दहा रूपयांनी जास्त आहे.
साखरेचा पाक
साखरेचे दर स्थिर असून मागील वर्षीच्या तुलनेत किलोमागे भाव पाच रूपयांनी भाव कमीच आहेत. उत्पादन भरपूर असल्याने दर स्थिर आहेत.
गावरान तिळाला मागणी
गुजरातचे गावरान तीळ मागील वर्षी १६० रूपये किलोपर्यंत होते. सध्या मात्र दर १३० रूपये किलो आहेत. थंडीमुळे तिळाची मागणी वाढत आहे.
स्वस्त असो वा महाग सण तर आनंदाने साजरा करावाच लागतो. तीळ, साखर, गुळ स्वस्त असलेतरी खाद्यतेल महाग आहे. - कंचन खिंवसरा, बीड.
दिवाळीपासून बाजार थंडच आहे. डाळींचे दर स्थर आहेत तर साखर, तीळ, गुळाचे दर गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याने गोडवा वाढणार आहे. - जगदीश सिकची, किराणा व्यापारी