दिलासा ! आष्टी तालुक्यातील 'त्या' कोंबड्यासह पक्षाचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 06:22 PM2021-01-19T18:22:11+5:302021-01-19T18:22:56+5:30
आष्टी तालुक्यातील कुकटपालन व्यवसायकांनी सोडला निसुटकेचा श्वास
कडा ( बीड ) : पाटोदा तालुक्यातील मुगगांव येथे बर्ड फ्ल्यूने कावळ्याचा मृत्यू झाल्यानंतर याचे लोन आष्टी तालुक्यात पसरले. दरम्यान, तालुक्यातील शिरापुर, धानोरा, पिंपरखेड येथे देखील पक्षी व कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र, पुणे येथील प्रयोगशाळेतून कोंबड्या आणि पक्षांचे अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे ग्रामस्थ आणि पशुसंर्वधन विभागाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.
आष्टी तालुक्यातील शिरापुर येथे साडेचारशे कोंबड्या दगावल्या होत्या. त्याच बरोबर धानोरा, पिंपरखेड येथे दोन पक्षी मृत अवस्थेत आढळून आले होते. या तीनही गावातील मृत पक्षांचा पंचनामा करून त्यांचे नुमने पशुसंर्वधन विभागाने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. सध्या बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने याचे रिपोर्ट काय येतात अशी धाकधूक ग्रामस्थांमध्ये होती. जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर जेथे पक्षी मृत आढळून आले त्या भागातील एक किलोमीटरपर्यंतच्या कोंबड्या खबरदारी म्हणून माराव्या लागल्या असत्या. दरम्यान, पशुसंर्वधन विभागाला आज याचा अहवाल प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आहे अशी माहिती तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ.मंगेश ढेरे यांनी दिली आहे. यामुळे शेतकरी व पोल्ट्री व्यावसायिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. कुठेही कोंबड्या किंवा पक्षी मृत आढळून आले तर घाबरून जाऊ न जाता त्याची माहिती त्वरी कळविण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.