साेमनाथ खताळ
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबविण्यात प्रशासन व आरोग्य विभागाला अपयश येत असल्याचे दिसत आहे. परंतु आतापर्यंत जिल्हा व परजिल्ह्यात नोंद झालेल्या ५५६ मृत्यूचे आरोग्य विभागाने ऑडीट केले असता ५० टक्केपेक्षा जास्त मृत्यू हे उच्चरक्तदा, मधुमे, श्वसन अशा विविध कोमॉर्बिड आजारांमुळे झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाबरोबरच इतर आजारांकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
धुम्रपान करणारे लोक, अस्थमा, दमा असे विविध श्वसनाचे आजार असणाऱ्या १०३ लोकांचा कोरोनात जीव गेला आहे. तसेच केवळ मधुमेह असणारे ३०, उच्चरक्तदाब असणारे ६४ आणि हे दोन्ही आजार असणारे ४८ जणांचा जीव गेला आहे. १३७ जणांना तर कुठलाही आजार नसताना जीव गेला आहे. ह्रदय, लिव्हर, किडनी आदी आजारांमुळेही कोरोना बाधितांचे मृत्यू झाले आहेत.
आजार लपवू नये, काळजी घ्यावी
कोमॉर्बिड आजार हे जास्त प्रमाणात वृद्ध लोकांमध्ये असतात. परंतु ते सांगत नाहीत. त्यामुळे त्यावर लवकर उपचार न झाल्याने तो वाढत जातात. त्यामुळे हे आजार न लपवता थोडाही त्रास झाल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात जावून तपासणी करावी.
कुठलाही आजार नाही, तरी १३७ मृत्यू
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार कुठलाही आजार नाही, परंतु कोरोना बाधित आल्यानंतर मृत्यू झालेल्यांची संख्या तब्बल १३७ एवढी आहे. तसेच १०० लोकांचा आजाराची परिस्थितीच समजली नसल्याचे समोर आले आहे.