सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी
बीड : शहरातील पांगरी रोड, पिंपरगव्हाण रोड या भागांत मागील आठवड्यापासून सुरळीतपणे पाणी येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगरपालिकेकडून याबाबत उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. पालिकेने किमान दोन दिवसांनी पाणीपुरवठा करावा, म्हणजे पाण्यासाठी भटकंती होणार नाही, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.
चोऱ्यांचे प्रमाण वाढले; बंदोबस्ताची मागणी
गेवराई : शहरातील हद्दवाढ झालेल्या भागात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांचा बंदोबस्त करून शहरात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
रस्त्याची दुरवस्था
बीड : तालुक्यातील हिंगणी ते नांदूर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मागील अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
रस्त्यांवर धुळीचे थर
परळी : शहरात सर्वत्र रस्त्यांवर धुळीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच नागरिकांना याचा त्रास होत आहे. नगर परिषदेने रस्त्यावरील धुळीचा बंदोबस्त करून रस्ते स्वच्छ ठेवण्याची मागणी आहे.
वीजपुरवठा खंडित
बीड : नेकनूर, येळंबघाट, चौसाळा या भागांत विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा केला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शेतीला पाणी देण्याचे हे दिवस असल्याने वारंवार वीज खंडित होत असल्याने अडचण येत आहे.
जनावरांचा ठिय्या
माजलगाव : शहरातील रस्त्यांवर अनेक मार्गांवर जनावरे ठिय्या मांडून बसत असल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. अनेक वेळा अपघाताची उदाहरणे आहेत. जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे.
कोंडी कायम
बीड : शहरातील भाजी मंडईत प्रत्येक रविवारी आठवडी बाजार भरतो; परंतु येथील अरुंद रस्ते व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे कोंडी कायम राहत आहे. पालिका अथवा पोलिसांकडून यावर कसलीच कारवाई होत नाही.