एकमेव आधार कोरोनाने हिरावला, पालकांना मदत कोण करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:22 AM2021-06-10T04:22:42+5:302021-06-10T04:22:42+5:30
बीड : कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने पाऊल उचलले आहे, तर अशा मुलांना शैक्षणिक दत्तक ...
बीड : कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने पाऊल उचलले आहे, तर अशा मुलांना शैक्षणिक दत्तक घेण्यासाठी काही सामाजिक संस्था पुढे येत आहेत. मात्र, ज्या पालकांचा एकुलता एक मुलगा कोरोनाने हिरावून घेतला त्या पालकांचा आता आधार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासाठी शासनपातळीवर, तसेच सामाजिक पातळीवर संघटनांना काम करावे लागणार आहे. बीड जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षा तीव्रतेने जाणवली. ऑक्सिजन बेडची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा आणि त्यानंतर झालेली प्रशासकीय यंत्रणेची धावपळ, ऑक्सिजनची जमवाजमव ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या उपाययोजनांमुळे रुग्णांवर उपचार झाले. कोविडच्या या लाटेमध्ये शून्य ते १८ वर्षांपर्यंतच्या ज्या मुलांचे आई- वडील हिरावले त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने महिला व बालविकास विभागाच्या बालसंगोपन आणि बालगृहाच्या माध्यमातून मदत करण्याचे पाऊल उचलले आहे. या मुलांना शासकीय योजनेनुसार आवश्यक ते लाभ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यातून अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षण, शिक्षणातून मुलांचे पुनर्वसन व्हावे, हा उद्देश शासनाचा आहे. राज्य शासनाच्या या योजनेच्या घोषणेनंतर केंद्र सरकारने ज्या मुलांचे आई- वडील दोघेही हिरावले आहेत. अशा मुलांसाठी पाच लाख रुपये मुदत ठेवीचा निर्णय घेतला. पालक हिरावलेल्या मुलांना या मदतीतून शासनाचा आधार मिळणार असला तरी ज्या कुटुंबास एकुलता एक मुलगा अथवा मुलगी गमावण्याची वेळ आली, त्या कुटुंबांतील पालकांच्या मदतीसाठी शासनाने अद्याप कुठलेही पाऊल उचलल्याचे दिसत नाही. त्यामुळे असे पालक दुर्लक्षित राहणार का, असा प्रश्न आहे.
कोरोनामुळे एकुलता एक मुलगा मृत्युमुखी पडला. त्यामुळे वयोवृद्ध पालक एकाकी पडल्याचे दिसत आहे. मध्यमवर्गीय तसेच गरीब घटकांतील पालक आर्थिकदृष्ट्या निराधार झाले. त्यांचा आधार कोण होणार, ही सामाजिक समस्या आता ऐरणीवर येणार आहे. पालकांना मानसिक व शारीरिक आधार देण्याची गरज आहे.
----
हतबलतेला आधार हवा
कोरोनामुळे अनेक कुटुंबांना बहिष्कृतासारखे जगावे लागले आहे. त्यात एकुलता एक आधार केल्यानंतर पालकांची मानसिक व शारीरिक अवस्था बिकट असते. आर्थिक कोंडी होते. नातेवाईक, शेजाऱ्याकडून वरपांगी मदत क्षणिक ठरते.
बहुतांश जण तर अशा पालकांशी संपर्कच ठेवत नाहीत, तसेच या पालकांना नातेवाइकांकडेही जाता येत नाही.
आर्थिक प्रश्न बिकट
ज्या पालकांचा कमावता मुलगा गेला ते पालक आर्थिकदृष्ट्या पूर्णत: निराधार झाले. वाढत्या वयामुळे हे पालक कामही करू शकत नाहीत. परिणामी, त्यांच्यापुढे आर्थिक अडचणींचा डोंगर आहे. वृद्धाश्रमात जायचे तर त्याचा खर्च कोण देणार, असाही प्रश्न आहे.
सामाजिक संस्थांनी पुढे यावे
एकुलता एक मुलगा गेल्याने असलेल्या पालकांना सामाजिक पातळीवर आधार देण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे आले पाहिजे. त्याचबरोबर कॉलनी, वसाहत, तसेच शहरातील नागरिकांकडून आवश्यक माणुसकीच्या पातळीवर सहकार्य करण्याची गरज आहे.
------------
एकाकी पडलेल्या ज्येेष्ठांना शासन यंत्रणेने आरोग्य सेवा घरपोहोच देण्याची गरज आहे. अनेक वयोवृद्ध ज्येष्ठांना बाहेर जाता येत नसल्याने घरातच राहावे लागते. त्यांना आवश्यक त्या सेवासुविधा, संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने शासनाने अशा पालकांच्या समस्या जाणून मानसिक आधार देण्याची गरज आहे. शासन सेवेतून निवृत्तीनंतरचे जीवन जगणाऱ्या ज्येष्ठांना वेळेवर निवृत्तीवेतन मिळाले तरीही मोठा आधार होईल. एकुलता एक मुलगा गमावलेल्या ज्येष्ठांना शासनाने विविध कल्याणकारी योजनांतून लाभ मिळवून देण्याची गरज आहे.
-ॲड. पांडुरंग गोरकर, अध्यक्ष, बीड जिल्हा पेन्शनर्स अँड सिनिअर सिटीझन असोसिएशन
कोरोनाचे एकूण रुग्ण - ८८,४७३
बरे झालेले - ८३,७७२
सध्या उपचार घेत असलेले - २,६३४
एकूण मृत्यू - २,०५८
-------