शिरुरकासार (श्री गुरू विरुपाक्ष साहित्य नगरी, मानूर)
: साहित्यिकांनी भंगलेली मनं जोडण्याची कामे करून समाजभान जपले पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर साळेगावकर यांनी व्यक्त केले. ते मानूर येथील श्री गुरू विरुपाक्ष साहित्य नगरीमध्ये एकता फाउंडेशनच्या वतीने आयोजित तिसऱ्या मराठी साहित्य संमेलनात ते बोलत होते. व्यासपीठावर उद्घाटक राजकुमार तांगडे यांच्यासह नागनाथ मानूर संस्थानचे महंत शिवाचार्य महाराज, सिद्धेश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्री, ज्येष्ठ नेते दशरथ वनवे, रामदास बडे, समितीच्या सभापती उषा सरवदे, सामाजिक कार्यकर्त्या चंपाबाई पानसंबळ, सरपंच चंद्रकला वनवे, उपसरपंच शौकत सय्यद, खलंदर पठाण, आदिनाथ नागरगोजे, पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, गटविकास अधिकारी बळीराम चव्हाण, गटशिक्षणाधिकारी जमीर शेख, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.आर.एस. बडजाते उपस्थित होते.
यावेळी साळेगावकर म्हणाले, प्राथमिक शिक्षण अनिवार्यपणे मराठी भाषेत देऊन मराठी शाळा टिकविणे गरजेचे आहे. लेखनाची बीजे शाळेत रुजायला हवीत. मराठी भाषेचे अस्तित्व जर आपणाला चिरकाल टिकवायचे असेल तर मराठी चित्रपट, नाटकं पाहणे गरजेचे आहे. आई जर जगली तर मावशीला अर्थ असल्याचे सांगत मराठी भाषेचा वापर सर्वत्र होणे गरजेचे आहे. कोरोनाकाळ खऱ्या अर्थाने मराठी साहित्याच्या दृष्टीने प्रभावी राहिला आहे. साहित्यिकांना या काळात वेळ मिळाला त्यामुळे नवीन साहित्य तयार होण्यासाठी मदत झाल्याचे ते म्हणाले. साहित्य संमेलनात सालाबादप्रमाणे याही वर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आले.
लक्ष्यवेधी ठरली ग्रंथदिंडी
मानूर बसस्थानक ते श्री गुरू विरुपाक्ष साहित्य नगरी यादरम्यान महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांसह साहित्यप्रेमींची ग्रंथदिंडी लक्ष्यवेधी ठरली. शिवाय ग्रंथदिंडीमध्ये वारकरी मुलांनी आपला सहभाग नोंदवून टाळ-पखावाजच्या गजरात विठूनामाचा जयघोष केला. मानूर गावातील महिलांनी आपल्या दारासमोर सडा-रांगोळ्या काढून ग्रंथदिंडीचे स्वागत केले.