बीड : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. याला बुधवारपासून बीड शहरात सुरुवात होत आहे. यासाठी ४ केंद्रे तयार केली असून, रोज १६०० चाचण्या करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. या मोहिमेतील सर्व चाचण्या अँटिजन असणार आहेत.
जिल्ह्यातील सर्वच व्यापारी, व्यावसायिक यांच्या कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. चाचणी केल्याशिवाय दुकाने उघडल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला असून, सर्वांना १५ मार्चपूर्वी चाचण्या करणे बंधनकारक केले होते. त्याप्रमाणे बीड शहरात बुधवारपासून चाचण्यांना सुरुवात होणार आहे. यासंदर्भात मंगळवारी जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाची बैठक घेतली, तसेच सायंकाळच्या सुमारास प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट यांनी शहरातील व्यापारी प्रतिनिधींची बैठक घेत त्यांना सूचना केल्या. यापूर्वीही अशी माेहीम राबविली होती. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता; परंतु यावेळी कसा प्रतिसाद मिळतो, हे १५ मार्चनंतर समजणार आहे.
येथे करा कोरोना चाचणी
शासकीय आयटीआय कोविड केअर सेंटर, चंपावती प्राथमिक विद्यालय, राजस्थानी विद्यालय वि.प्र. नगर, जिल्हा परिषद शाळा अशोकनगर बार्शी नाका, या चार ठिकाणी व्यापाऱ्यांनी अँटिजन चाचणी करायची आहे.
असे असेल नियोजन
या मोहिमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन केंद्रांमागे एक संनियंत्रण अधिकारी, प्रत्येक बुथवर दोन वैद्यकीय अधिकारी, ४ तंत्रज्ञ, ३ आरोग्य सहायक, २ शिक्षक, २ कक्षसेवक आणि २ पोलीस कर्मचारी, असे पथक असणार आहे.
ऑनलाइन प्रमाणपत्र मिळणार
ज्या व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली त्यांना लक्षणे पाहून कोविड केअर सेंटर अथवा रुग्णालयात दाखल केले जाणार आहे; परंतु ज्यांची निगेटिव्ह आली, अशांना ऑनलाइन प्रमाणपत्र दिले जाणार आहे. चाचणी निगेटिव्ह आल्यास त्यांना दुकाने उघडण्यास परवानगी राहणार असल्याचे सांगण्यात आले. प्रमाणपत्र देण्यासाठी ऑपरेटरची नियुक्ती केली असून, सायंकाळच्या सुमारास ते दिले जाणार असल्याचे समजते.