अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यात दररोज कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. शुक्रवारी अंबाजोगाई तालुक्याचा कोरोना रुग्णांचा आकडा शंभर पार झाला. गेल्या चार दिवसांत कोरोनाचे नवीन ३५१ रुग्ण अंबाजोगाई तालुक्यात निघाले आहेत. गेल्या आठ महिन्यात अंबाजोगाई तालुक्यातील हा आकडा सर्वोच्च ठरला. त्यामुळे अंबाजोगाई तालुक्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंबाजोगाई तालुक्यात जुलै महिन्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली. पहिला रुग्ण जुलै महिन्यात निष्पन्न झाला होता. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांचा आलेख वाढतच राहिला. गेल्या आठ महिन्यात अंबाजोगाई तालुक्यात ३५०० पेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित निघाले. या मार्च महिन्यात तर कोरोनाच्या रुग्णांनी अंबाजोगाई तालुक्यात उच्चांक गाठला. या महिन्यातीलच रुग्णसंख्या हजारांच्या आसपास पोहचते की काय? अशी भीषण स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसांत कोरोनाचे ३५१ रुग्ण निष्पन्न झाले आहेत. तर आज शुक्रवारी आजपर्यंतचा सर्वात मोठा आकडा म्हणजे कोरोना रुग्णांनी अंबाजोगाई तालुक्यात शंभरी गाठली आहे.
कोरोना रुग्णांची ही वाढती संख्या अंबाजोगाई तालुक्यातील रहिवाशांसाठी चिंताजनक ठरू लागली आहे. सध्या लॉकडाऊन झाले असले तरी नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसुत्रीचा अवलंब करून सुरक्षितता बाळगण्याकडे मोठा भर द्यावा लागणार आहे. तरच या वाढत्या रुग्णसंख्येला आळा बसेल. अन्यथा नागरिकांनी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन न केल्यास पुन्हा कोरोनाचा आकडा वाढण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे.