कोरोनाचा तीर्थक्षेत्राला मोठा आर्थिक फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:31 AM2020-12-31T04:31:56+5:302020-12-31T04:31:56+5:30
अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : तीर्थक्षेत्र असलेल्या अंबाजोगाई शहराला कोरोनाचा मोठा आर्थिक फटका बसला. परिणामी वर्षभर बाजारपेठेत आर्थिक मंदी ...
अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : तीर्थक्षेत्र असलेल्या अंबाजोगाई शहराला कोरोनाचा मोठा आर्थिक फटका बसला. परिणामी वर्षभर बाजारपेठेत आर्थिक मंदी राहिली. ज्यांचे उद्योग व्यवसाय मंदिर परिसरात आहेत. त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली. वर्षभराचा कालावधी उलटला तरीही अजून या मंदीतून अंबाजोगाईकर बाहेर निघाले नाहीत.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र व राज्याबाहेरून लाखो भाविक येत असतात. अंबाजोगाई हे तीर्थक्षेत्र म्हणून महाराष्ट्रात परिचित आहे. श्री योगेश्वरीचा महिमा तर आहेच. याशिवाय मराठीचे आद्यकवी मुकुंदराज स्वामी, संतकवी दासोपंत व निसर्गरम्य ठिकाण म्हणून अंबाजोगाई पर्यटकांना आकर्षित करू लागले आहे. कोकणस्थांची कुलस्वामिनी योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे, नागपूर व विविध ठिकाणांहून लोक दर्शनासाठी येतात. प्रामुख्याने दसरा नवरात्र महोत्सव. मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव, दिवाळीच्या सुट्या, उन्हाळ्याच्या सुट्या व प्रत्येक महिन्याची पौर्णिमा या कालावधीत भाविकांची मोठी गर्दी अंबाजोगाईत होते. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे अंबाजोगाईची बाजारपेठ फुलत चालली आहे. वाहनतळ, हातगाडे, पानफुलांचे दुकाने, प्रसादाची दुकाने, खेळण्याची दुकाने, साड्यांची दुकाने, हॉटेल्स, उपाहारगृह, पुरोहित यांची संपूर्ण मदार येणाऱ्या पर्यटकांवरच अवलंबून असते. मात्र, गेल्या मार्च महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद ठेवण्यात आली. तब्बल सात महिने मंदिरे उघडलीच नाहीत. परिणामी सर्व व्यवहार ठप्प राहिले. अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली. पुरोहितांना काम राहिले नाही. अशा स्थितीत अनेकांनी उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करणे सुरू केले. मंदिरे उघडल्यानंतर काही उलाढाल होईल, अशी अपेक्षा असताना भाविकांवर व व्यापाऱ्यांवर अनेक निर्बंध लादले गेले. यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यामुळे भाविकांनीही अंबाजोगाईकडे पाठ फिरविली. जे उत्सव झाले. ते भाविकांविना व इनडोअर झाल्याने बाजारपेठेला याचा कसलाच फायदा झाला नाही. गेल्या वर्षभरात आर्थिक मंदीचे सावट अद्यापही अंबाजोगाईकरांवर घोंगावतच आहे.