Coronavirus : बीड शहरासह बारा गावांमध्ये 4 जूनपर्यंत संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 01:30 AM2020-05-28T01:30:43+5:302020-05-28T01:32:07+5:30
कोरोना बाधित एका रुग्णाचा शहरातील तीन दवाखान्यासह विविध ठिकाणी संपर्क आल्याची माहिती स्पष्ट होत असल्याने प्रशासनाला हा कठोर निर्णय घ्यावा लागला.
बीड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार 4 जूनपर्यंत संपूर्ण बीड शहरात तसेच बारा गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी रात्री बारा वाजेदरम्यान सदर आदेश लागू केले आहेत.
कोरोना बाधित एका रुग्णाचा शहरातील तीन दवाखान्यासह विविध ठिकाणी संपर्क आल्याची माहिती स्पष्ट होत असल्याने प्रशासनाला हा कठोर निर्णय घ्यावा लागला. संपूर्ण बीड शहर तसेच बीड तालुक्यातील खंडाळा, चऱ्हाटा, पालवण,ईट, पाटोदा तालुक्यातील वैजाळा,डोंगर किन्ही, वडवणी तालुक्यातील देवडी, गेवराई तालुक्यातील खांडवी, मादळमोही, धारवंटा, केज तालुक्यातील खरमाटा आणि धारुर तालुक्यातील पारगाव या गावांमध्ये आठ दिवसांसाठी 4 जून रोजी रात्री बारा वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात आली आहे त्यानुसार कुणालाही घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे वैद्यकीय सेवा, वर्तमानपत्रे, माध्यमांविषयी सेवा 24 तास सुरू राहतील. बीड शहरात वरील गावांमध्ये विशेष परवानगीशिवाय कोणालाही या कालावधीत प्रवेश करता येणार नाही. तसेच शहराबाहेरही जाता येणार नाही.
अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालय वगळता सर्व कार्यालये बंद राहतील. परंतु बीड शहरातील शासकीय कार्यालयांचे विभाग प्रमुख आणि बँकांना अतिशय आवश्यकता भासल्यास उपजिल्हाधिकारी रोहयो बीड यांच्याशी संपर्क साधून अत्यावश्यक बाब म्हणून कार्यालय उघडण्याची तसेच अतिशय मर्यादित कर्मचाऱ्यांना बोलण्याची परवानगी घ्यावी. बीड शहरातील व इतर या गावातील नागरिकांना इतर जिल्ह्यात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पास मिळणार नाही. परंतु मेडिकल अत्यावश्यक मधील पाससाठी बीड शहरातील नागरिकांनी ऑनलाइन अर्ज संकेत स्थळावर भरून प्राप्त करून घ्यावा.
बीड शहरातील तसेच या 12 गावातील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप तात्काळ डाऊनलोड करून वापरणे बंधनकारक राहील. विषाणूंच्या अनुषंगाने ताप, सर्दी, खोकला डोकेदुखी, श्वसनास त्रास आदी लक्षणे आढळून आल्यास सदर ॲप मध्ये सेल्फ असेसमेंट सदराखाली आपली माहिती तात्काळ भरावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
ध्वनीक्षेपकाद्वारे दिली माहिती
बीड शहरात 27 मे रात्री बारा वाजेपासून पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात रात्री 11:30 वाजेपासून पोलिसांनी ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सार्वजनिकरीत्या कळविले आहे. या कालावधीत कोणालाही फिरता येणार नाही. वाहनावरून जर कोणी जात असेल तर ते वाहन जप्त करण्यात येईल अशी तंबी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात ५६ रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या 56 झाली आहे. बुधवारी 45 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 अहवाल पॉझिटिव्ह आला असून 41 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 3 अहवाल अनिर्णित आले आहेत. पॉझिटिव आलेला रुग्ण बीड तालुक्यातील बेलापूरी येथील असल्याची माहिती मिळत आहे.