coronavirus : बीडकरांसाठी सुखद बातमी; कोरोनामुक्त दोघांना रुग्णालयातून सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 11:21 AM2020-05-27T11:21:28+5:302020-05-27T11:21:54+5:30
दहा दिवस उपचार घेतल्यानंतर कोरोनामुक्त झालेल्या दोघांना बुधवारी जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
बीड : साधारण ११ दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला. दहा दिवस उपचार घेतल्यानंतर कोरोनामुक्त झालेल्या दोघांना बुधवारी जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यावेळी टाळ्या वाजवून त्यांना घरी पाठविले. बीडकरांसाठी ही सुखद बातमी ठरली आहे.
१६ मे रोजी गेवराई तालुक्यातील इटकुर येथील १२ वर्षीय मुलगी कोरोना पॉजिटिव्ह आढळली. त्यानंतर माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील तरूणाला बाधा झाल्याचे उघड झाले. त्यानंतर हा आकडा वाढत गेला आणि सद्यस्थितीत तो ५५ झाला आहे. सुरूवातीला आढळलेल्या दोन रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारीका, टेक्निशिअन, कक्ष सेवक यांनी योग्य उपचार करून काळजी घेतली. त्यामुळे ते कोरोनामुक्त झाले. बुधवारी त्यांना घरी पाठविण्यात आले. त्यांना रुग्णवाहिकेत बसविण्यापूर्वी टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. यावेळी आरोग्य, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
बीडमधून कोरोनामुक्त झालेले पहिले रुग्ण
आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील ६३ वर्षीय व्यक्ती जिल्ह्यातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण होता. त्याच्यावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयताच उपचार करण्यात आले होते. आता बुधवारी सुट्टी झालेले दोन्ही कोरोनामुक्त रुग्ण हे जिल्ह्यातील पहिले आहेत. त्यांच्यावर बीडच्या डॉक्टरांनी उपचार करून कोरोनामुक्त केले आहे.
नव्याने घेतले ४६ स्वॅब
बीड जिल्ह्यातून बुधवारी कोरोना संशयित असलेल्या ४६ लोकांचे स्वॅब घेण्यात आले. त्याचा अहवाल रात्री उशिरा येईल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.