पतपेढी ऐवजी भूजल पेढी निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:31 AM2021-03-25T04:31:13+5:302021-03-25T04:31:13+5:30
अंबाजोगाई : भूगर्भातील पाण्याचा होणारा अतिरेकी उपसा आणि निर्दयीपणे केलेली वृक्षांची कत्तल यामुळे पावसावर होणारा विपरीत परिणाम आणि त्यातून ...
अंबाजोगाई :
भूगर्भातील पाण्याचा होणारा अतिरेकी उपसा आणि निर्दयीपणे केलेली वृक्षांची कत्तल यामुळे पावसावर होणारा विपरीत परिणाम आणि त्यातून निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य,त्यामुळे मानव आज पाणीटंचाईला सामोरे जात आहे. हे आपणच अविवेकीपणाने ओढवून घेतलेले संकट आहे. निसर्ग मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे.परंतु,माणसाची हाव तो पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे पतपेढीपेक्षा भूजल पेढी निर्माण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जलमित्र तथा समाजचिंतक प्रसाद चिक्षे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केले. येथील कृषी महाविद्यालयात रासेयोच्या वतीने जागतिक जल दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालय,अंबाजोगाईचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे हे होते तर व्यासपीठावर डॉ.अरुण कदम व जिमखाना उपाध्यक्ष डॉ. प्रताप नाळवंडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी चिक्षे म्हणाले, पाणी हेच जीवन आहे, हे सर्वश्रुत आहे. परंतु विद्यार्थ्यांनी आपलं जीवन पाण्याप्रमाणे प्रवाहीपणे जगले पाहिजे. प्रसाद चिक्षे यांनी ते करत असलेल्या पाणी बचतीच्या कामाविषयीचे अनुभव कथन केले. प्रास्ताविक जिमखाना उपाध्यक्ष डॉ.प्रताप नाळवंडीकर यांनी केले.सूत्रसंचालन डॉ. दीपक लोखंडे यांनी केले तर आभार प्रा. संजय राठोड यांनी मानले.
जलसाक्षर व्हा
पाणी ही नैसर्गिक संपत्ती असून त्याचे जतन व संवर्धन आवश्यक आहे. कृषीच्या विद्यार्थ्यांनी कृषी अक्षराबरोबरच जल साक्षर होऊन शेतकऱ्यांचे अन्नधान्य उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सहकार्य करावे. प्रक्षेत्रावर समतल चर विकसित करून जागेवर पाणी अडवून पूर्णतः जिरवावे. पाणी आणि वाणी समतोल वापरून वर्तमानाबरोबरच भविष्यकाळ ही सुनिश्चित करावा असे आवाहन अध्यक्षीय समारोपात डाॅ.बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.
===Photopath===
240321\24bed_3_24032021_14.jpg