राजकीय चर्चांचा रोजचा ‘बस’ प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 12:23 AM2019-04-04T00:23:18+5:302019-04-04T00:24:07+5:30

समस्याच समस्या; दुष्काळामुळे परेशान बीड -गेवराई- बीड 70 किमी सतीश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बीड लोकसभा मतदार ...

Daily 'bus' migration of political discussions | राजकीय चर्चांचा रोजचा ‘बस’ प्रवास

राजकीय चर्चांचा रोजचा ‘बस’ प्रवास

Next
ठळक मुद्दे३ विधानसभा मार्ग । ११६ किमी प्रवास । एसटीच्या लाल डब्यात बसून ‘लोकमत’ प्रतिनिधीने जाणून घेतले जनतेचे ‘मत’

समस्याच समस्या; दुष्काळामुळे परेशान
बीड-गेवराई-बीड
70 किमी
सतीश जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड लोकसभा मतदार संघात पाहिजे तसा जोर पकडला नाही. जिकडे तिकडे दुष्काळाचे सावट निवडणुकीच्या प्रचारावर घोंगावते आहे. पिण्यास पाणी नाही, जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न, खरीप आणि रबी दोन्हीही हंगाम हातचे गेल्यामुळे ग्रामीण भागात भयावह परिस्थिती असल्याचे प्रवाशांशी झालेल्या चर्चेत जाणवले.
ग्रामीण भागातील निवडणुकीचे चित्र जाणून घेण्यासाठी बीड ते गेवराई आणि गेवराई ते बीड असा एसटी महामंडळाच्या लालपरीतून गेवराई विधानसभा मतदार संघाचा प्रवास केला. गेवराईपर्यंत राष्टÑीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असल्यामुळे रस्ता एकदम गुळगुळीत असल्यामुळे अजिबात धक्के जाणवले नाही परंतु, निवडणुकीचा जेव्हा विषय काढला तेव्हा ग्रामीण भागात भोगत असलेल्या असुविधांचे धक्क्यावर धक्के बसत होते. कशाची निवडणूक आणि कशाचे काय साहेब? सारेच पक्ष सारखे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे तसेच राहणार, असे सांगत प्रवासी दादासाहेब मोरे यांनी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे आणि जनावरांचे कसे हाल होत आहेत, हे सांगितले.

शेतक-याला जगविणारं सरकार पाहिजे
बीड ते कचारवाडी
24 किमी
अनिल भंडारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कशाचं समाधान, औंदा दुष्काळामुळे चिपटंभर दाना मिळाला, कापूस वाया गेला, जनावरांचे हाल आहेत. आरोग्य, पाण्याची वाईट परिस्थिती आहे. शहराकडंच सरकारचं लक्ष हाय, खेड्याकडं कोण पाहतंय, शेतकºयाला जगविणारे सरकार पाहिजे, अशी एकमुखी अपेक्षा बीड मतदार संघातील ग्रामीण मतदारांनी लोकमतजवळ व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड ते कचारवाडी प्रवासात नागझरी, जाधववाडी, विठ्ठलवाडी, बेलखंडी, पाटोदा, मेंगडेवाडी, पिंपळवाडी येथील प्रवाशांशी लोकमतने संवाद साधला. या भागात पिण्याच्या पाण्याची मोठी योजना नसल्याने टंचाईचा नेहमी प्रश्न असतो. सध्या वस्त्यांवरच पाणी मिळतंय, गावात टॅँकर येत नसल्याचे प्रवासी महिलेने सांगितले. विठ्ठलवाडीत पाण्याची योजना, नीट रस्ता नाही, खेड्याकडं पाहयला नेत्यांना वेळच नाही, असे कांताबाई नैराळे, साहेबराव नैराळे म्हणाले. अनुदान कमी मिळाल,असे मारुती वनवे बोलत होते.
या लोकांना उपचारासाठी बीडलाच यावे लागते, माणसाचं जसं तसंच जनावरांचं आहे. खाजगी डॉक्टरांकडंच जावं लागतं, असे प्रवासी सांगत होते. तुम्ही समाधानी आहात का? असा प्रश्न केला तेव्हा कशाचं समाधान ? खरीप गेला, रबी गेला, काही मिळालं नाही असे पाटोद्याचे बाबूराव शेळके म्हणाले. ओझे घेऊन लेकरांना पाच किलोमीटर लांब शाळेत जावे लागते. शिक्षणासाठी बीडला बसची सोय अपुरी आहे. जादा बस व सुरक्षेची गरज असल्याचे पल्लवी आणि दीपाली उबाळे म्हणाल्या.
विकासाबरोबर उद्योग, तरुणांना रोजगार हवा
धारूर ते तेलगाव
22 किमी
अनिल महाजन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारुर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. धारुर ते तेलगाव प्रवासात माजलगाव मतदारसंघातील मतदारांच्या भावना जाणून घेतल्या. पाच वर्षांमध्ये विकासाला एक दिशा मिळाली आहे. विकास नाकारता येणार नाही असे काही प्रवासी म्हणाले. रस्ता, रेल्वे किंवा ग्रामीण रस्त्याचे प्रश्न सोडवताना तरुणांना नोकरी, उद्योग, व्यवसायाची जोड लावून दिली असती तर सरकारचे यश आणखी दिसून आले असते अशा भावना काही प्रवाशांनी व्यक्त केल्या.
रेल्वेचे काम पूर्ण झाले असते तर विकासाला नवी दिशा मिळाली असती. डोंगरपट्ट्यातील धारुर राष्ट्रीय महामार्गावर आल्याने या भागात उद्योगाला चालना, तरुणांना रोजगार मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. येथील ऐतिहासिक स्थळांचा विकास व्हावा , असेही काही प्रवासी म्हणाले. या भागातील ऊसतोड कामगारांची संख्या थोपवायची असेल केंद्राकडून विशेष उद्योग उभारणे गरजेचे आहे. सीताफळ प्रक्रिया उद्योगाबरोबर शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचीही जोड देणे गरजेचे आहे अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली.

Web Title: Daily 'bus' migration of political discussions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.