परळी : शहराला पाणी पुरवठा करणारे नागापूर येथील 'वाण ' मध्यम धरण बुधवार दि. २३ रोजी पहाटेपासूनच सांडव्यावरून भरून वाहू लागले असून धरण ओव्हररफ्लो' झाल्याने नागापूरकर व परळीकर आनंदित झाले आहेत.
याआधी २०१७ साली वाण धरण 'ओव्हररफ्लो' झाले होते. दीड लाख लोकसंख्या असणाऱ्या परळी शहराची तहान भागविणाऱ्या या धरणातील गाळ ऊपसा झाल्यामुळे पाणी साठा वाढला आहे. धरण भरल्यामुळे आता तालुक्यातील नागापूर, अस्वलआंबा, दौनापूर, मांडेखेल, नागपिंपरी, भिलेगाव, परचुंडी, मल्लनाथपुर, टोकवाडी, तळेगाव इंजेगाव ,पांगरी, लिंबोटा येथील शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी फायदा होऊ शकतो. अंबाजोगाई, परळी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे धरण भरले आहे. तीन दिवसांपासून परळीकरांचे लक्ष धरण कधी भरते, याकडेच होते. त्यामुळे धरण भरल्याची वार्ता येताच हौशी परळीकरांनी धरणाला भेट दिली आणि ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेतला. तालुक्यातील सारडगाव जवळील बोरणा प्रकल्पही १०० टक्के भरला आहे. तसेच शहराजवळील चांदापूर धरणही भरले आहे.