अंबाजोगाईत पोहण्यास गेलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:15 AM2018-05-09T00:15:14+5:302018-05-09T00:15:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मित्रांसोबत विहिरीवर पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी अंबाजोगाई शहरातील कंपनी बाग परिसरात घडली.
यश नंदकुमार देशपांडे (१६) असे मयत मुलाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी तो अन्य दोन मित्रांसोबत कंपनी बाग परिसरातील विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. परंतु, पोहण्यात तरबेज नसल्याने तो अचानक पाण्यात बुडाला. यावेळी तिथे पोहण्यासाठी आलेल्या शेख अफजल या तरूणाने विहिरीत उडी मारून बुडालेल्या यशला बाहेर काढले. बेशुद्धावस्थेत असणाऱ्या यशला तातडीने स्वाराती रूग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले.
यश हा पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी नंदकुमार देशपांडे यांचा मुलगा होता. योगेश्वरी नूतन शाळेचा विद्यार्थी असून त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. तो एक उत्तम फुटबॉलपटू आणि निष्णात खो-खो खेळाडू असल्याचे त्याच्या शिक्षकांनी सांगितले.
सुटीत अनेक मुले पोहण्यास जातात. मात्र पोहण्याआधी जलकुंभ, तलावाचा अंदाज घेत नाहीत. सुरक्षेबाबत काळजी घेत नाहीत. पोहण्यास जाताना सर्व पातळीवर काळजी घेण्याची गरज आहे.