तालुक्यात मतदार यादीत नाव लावणे, वगळणे, दुरुस्ती करणे, मतदार माहिती ऑनलाईन करण्यासाठी प्रत्येक केंद्रावर शिक्षक, ग्रामसेवक, नगर परिषद कर्मचारी हे आपले शैक्षणिक व कार्यालयीन कामकाज सांभाळून व अत्यंत अडचणीत बीएलओची जबाबदारी पार पाडत असतात. तसेच बीएलओंनी मागील काळात मतदार यादी पुनर्रनिरीक्षणअंतर्गत मतदाराचे नाव लावणे, कमी करणे, दुरुस्ती करणे, दुबार व मयत वगळणे आणि बीएलओ ॲपवर मतदारांची संपूर्ण माहिती ऑनलाईन करणे अशी कामे वाडी - वस्ती - तांड्यावर फिरून दारोदार जाऊन माहिती ऑनलाईन करून केली आहेत. बीएलओंना केलेल्या कामाचा मोबदला म्हणून वार्षिक ६००० रुपये मानधन देण्याची तरतूद आहे. परंतु मागील दोन वर्षाचे प्रत्येकी बारा हजार रुपये मानधन निवडणूक विभाग यांच्याकडून बीएलओंना दिले गेले नाहीत. तसेच निवडणूक विभागाचे वर्षभर काम बीएलओ जबाबदारीने पूर्ण करत असतानासुद्धा शासन निर्णय २ फेब्रुवारी २०२१मधील तरतुदीनुसार निवडणूक कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अपघात अथवा मृत्यू झाला तर त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला सानुग्रह अनुदान म्हणून ३० लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. परंतु सदरील योजनेत बीएलओंचा कोठेही उल्लेख केलेला नाही. म्हणून सदरील योजनेत बीएलओंचा समावेश करावा, अशा मागणीचे निवेदन रामेश्वर स्वामी (नायब तहसीलदार, निवडणूक विभाग) यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर निधीची उपलब्धता करून बीएलओंना मानधन देण्यात यावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष सर्जेराव चव्हाण, तालुकाध्यक्ष रमेश रुद्रे, मार्गदर्शक रत्नाकर डोंगरे, तालुका संघटक किरण गांधले, माधव पंतोजी, सिद्धेश्वर वाकडे, बळीराम नाईकवाडे, नितीन जाधवर, बाबासाहेब सिरसट, ग्यानबा वागतकर आदी पदाधिकारी आणि बीएलओ उपस्थित होते.
बीएलओना थकीत मानधन देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 4:31 AM