बीड जिल्ह्यात ईव्हीएम, व्हीव्हीपॅटचे सार्वजनिक ठिकाणी होणार प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:15 AM2018-11-06T00:15:30+5:302018-11-06T00:17:21+5:30
ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅटच्या प्रथमस्तरीय तपासणीनंतर आता जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर, प्रत्येक गावातील, शहरातील मुख्य चौक, बाजार, नाका, शासकीय कार्यालये, सभांची ठिकाणे इत्यादी मोक्याच्या ठिकाणी फिरते वाहन पथकाद्वारे ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक गावागावात दिले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅटच्या प्रथमस्तरीय तपासणीनंतर आता जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर, प्रत्येक गावातील, शहरातील मुख्य चौक, बाजार, नाका, शासकीय कार्यालये, सभांची ठिकाणे इत्यादी मोक्याच्या ठिकाणी फिरते वाहन पथकाद्वारे ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक गावागावात दिले जाणार आहे. यासाठी निवडणूक विभागाने स्वतंत्र दोन टीम तयार केल्या आहेत.
बीड लोकसभा मतदार संघासाठी प्राप्त मतदान यंत्र (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅटची प्रथमस्तरीय तपासणी ९ ते २६ आॅक्टोबरदरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात घेण्यात आली. अभिरुप मतदानासाठी संरक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या भारत इलेक्ट्रॉनिक्सचे सौरभ सिंग आणि २२ अभियंते उपस्थित होते.
प्रथमस्तरीय तपासणी दरम्यान अनिरुध्द साळवे, औदुंबर पुजारी, साळवे राहुल (सर्व शिवसेना पक्ष प्रतिनिधी), संदीप क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम, देविदास जाधव, प्रकाश राठोड, दत्तात्रय शिंदे, फारुक पटेल, परवेज देशमुख (सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रतिनिधी), चंद्रकांत फड, पोकळे गणेश, संजय घोलप, विजय धस, स्वप्नील गलधर, दयावान मुंडे (सर्व भारतीय जनता पक्ष प्रतिनिधी), राजेंद्र मोटे (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना), गणेश पवार (शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना), सतीश कापसे (जिल्हाप्रभारी बहुजन समाज पार्टी), शेख अफसर शेख गफूर (जिल्हाप्रभारी बहुजन समाज पार्टी), शेख अलीम शेख चाँद (जिल्हा कोषाध्यक्ष, बहुजन समाज पार्टी), अनिल सिरसट (विधानसभा गेवराई बहुजन समाज पार्टी) इत्यादी राजकीय प्रतिनिधी उपस्थित होते.
६ विधानसभा मतदारसंघात फिरणार पथक
जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या नवीन एम-३ श्रेणीचे प्रत्यक्ष मतदान यंत्र (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी हाताळून पाहिले. या तपासणीचे व्हिडीओ चित्रण, वेबकास्टींग सुध्दा झाले. सदर गोदामात २५ वेबकॅमेरे लावलेले होते. शिवाय हॉलच्या मुख्य प्रवेश द्वारावर मेटल डिटेक्टर फ्रेम मधूनच प्रवेश होता.सदर प्रक्रियेदरम्यान कोणालाही आपला मोबाईल फोन घेऊन जाण्यास परवानगी नव्हती. पुरेसा पोलीस बंदोबस्त होता. हे यंत्र मतदान केंद्रावर १० ते १२ तास व्यवस्थित चालू शकतील का याबाबत तपासणी करण्यात आली. ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या तपासणीनंतर त्याच्या वापराबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदार संघात प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांसाठी प्रत्येकी दोन टीममध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅटसह ५ कर्मचाऱ्यांचा सहभाग राहणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिली.