३० गावांमध्ये रोज १०० झाडे लावून जगविण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:21 AM2021-07-23T04:21:07+5:302021-07-23T04:21:07+5:30
बीड : कोरोनाकाळात ऑक्सिजनची किंमत प्रत्येकाला जाणवली आहे. तसेच मागील काळात वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्यामुळे वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करणे ...
बीड : कोरोनाकाळात ऑक्सिजनची किंमत प्रत्येकाला जाणवली आहे. तसेच मागील काळात वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्यामुळे वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यासाठी नेकनूर परिसरातील काही प्रशासकीय अधिकारी व तरुणांनी मिळून बीजांकुर नावाची मोहीम सुरू केली आहे. या माध्यमातून रोज १०० झाडे लावण्याचा उपक्रम राबविला जात आहे. तसेच झाडे जगविण्यासाठी गावातील नागरिकांवर जबाबदारी दिली जात आहे. वृक्षसंवर्धनाच्यासंदर्भात जनजागृती केल्यामुळे ग्रामस्थांचाही या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मागीलवर्षी नेकनूर पोलीस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्यासह अशोक शिंदे, मनोज गव्हाणे, सुरेश रोकडे, रामनाथ घोडके, अमोल नवले यांच्यासह ‘मॉर्निंग टी’ आणि बीजांकुर ग्रुपनेे नेकनूरसह परिसरात बीजारोपण व वृक्षारोपण करीत झाडांचे महत्त्व अधोरेखित केले होते. या मोहिमेची आता चळवळ होण्यासाठी जनजागृती सुरू आहे. याचा प्रारंभ तालुक्यातील कळसंबर येथून झाला. ग्रामस्थांनी वड, पिंपळ, लिंबाचे वृक्षारोपण करून ते जतन करण्याचा संकल्प केला आहे.
गेल्यावर्षी डोंगरमाथ्यावर ७५ हजार बीजरोपणासह नेकनूर बाजारतळ, चाकरवाडी, मांडवखेल, भंडारवाडी येथे हजारो झाडांची लागवड केली होती. ती झाडे आता मोठी झाली आहेत. यावर्षी मात्र नेकनूर पोलीस ठाणेअंतर्गत असलेल्या ३० गावांमध्ये १५ जुलै ते १५ ऑगस्ट या एका महिन्याच्या कालावधीत रोज १०० याप्रमाणे ३००० झाडे लावून ती ग्रामस्थांच्या सहकार्याने जोपासण्याचे काम हाती घेत ‘हरित गाव’ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.
रोपांचा केला जातो पुरवठा
गावांमध्ये वृक्षारोपण करायचे असल्यास बीजांकुर ग्रुपच्यावतीने त्या गावांमध्ये रोपांचा पुरवठा केला जातो. तसेच ग्रुपमधील सदस्य त्या गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांसोबत वृक्षारोपण करतात. तसेच ग्रामस्थांमध्ये वृक्षसंवर्धनाची गरज याविषयी जनजागृती केली जाते.
नागरिकांनी मोठ्या प्रमाणत सहभागी व्हावे
बालाघाट परिसरातील डोंगर बोडखे झालेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. दरम्यान, ग्रामीण भागातही वृक्षलागवड करणे गरजेचे असून, ‘हरित गाव’ या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन वृक्षलागवड करावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी केले आहे.
200721\2959565620_2_bed_8_20072021_14.jpg~200721\3000565920_2_bed_7_20072021_14.jpeg
ग्रमस्थांच्या मागणीनुसार रोपांचा पुरवठा केला जातो.~डोंगर रांगावर वृक्षारोपण करताताना सपोनि लक्ष्मण केंद्रे, अशोक शिंदे, गोरख वाघमारे, रामनाथ घोडके, मनोज गव्हाणे, सुरेश रोखडे, अमोल नवले यांच्यासह बिजांकूर गृपचे सदस्य व ग्रामस्थ दिसत आहेत.