मी गहिनिनाथ गडाचा सेवेकरी; यापुढे निमंत्रणाची वाट न पाहता येत राहणार: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 02:27 PM2024-02-03T14:27:13+5:302024-02-03T14:29:57+5:30
वारकरी संप्रदायाचा मंत्र जपुया सर्व एकत्र राहुयात
- नितीन कांबळे
कडा- गडाचा सेवेकरी म्हणून सेवा करत असताना भक्ताची गैरसोय होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर निधी दिला जाईल. मागील वर्षाचा दिलेला शब्द या वर्षी २५ कोटी रूपये देऊन पूर्ण केला आहे. यापुढे देखील विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच मी गहिनिनाथ गडाचा सेवेकरी आहे, यापुढे निमंत्रणाची वाट न पाहता देखील गडावर येत राहणार, अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बीड जिल्ह्य़ातील पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथील श्री.संत वामनभाऊ महाराज याच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आज दुपारी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर, खासदार डाॅ. प्रितम मुंडे, बाळासाहेब आजबे,आ.सुरेश धस, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आ. मोनिका राजळे, आ. लक्ष्मण पवार, माजी मंत्री प्रा. राम शिंदे,माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आ.साहेबराव दरेकर, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, हभप उत्तम स्वामीजी ओमप्रकाश शेटे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराजांनी सेवेकरी म्हणून मला गडावर मान दिला आहे. पुष्षवृष्टीसाठी उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर सेवेकरी म्हणून आलोय. मागच्या पुण्यतिथीला विकास कामाचा दिलेला शब्द यावर्षी पूर्ण केला.भविष्यात येणाऱ्या निधीतून मोठा निधी दिला जाईल.अठरा पगड जाती धर्मातील सर्व नागरिक येतात. आल्यावर येथे गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत. वारकरी संप्रदायाचा मंत्र जपुया सर्व एकत्र राहुयात. महाराज तुम्ही दरवर्षी मला गडावर बोलवता पण आता निमंत्रणाची वाट न पाहता देखील मी येणार असल्याच्या भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड.प्रकाश, पालकमंत्री धनजंय मुंडे,खासदार डाॅ.प्रितम मुंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भाषणे झाली. कार्यक्रमास जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्तॅ मोठ्या संख्येने उपस्थित होते.गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले.