परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील प्रभू वैद्यनाथाच्या पायरीचे दुसऱ्या श्रावण सोमवारी शेकडो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती. दुपारी 12 वाजेनंतर ही भाविक येणे सुरूच होते .
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे जनआशीर्वाद यात्रेसाठी परळी शहरात आले असता प्रभू वैद्यनाथाच्या पायरीचे त्यांनी सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी माजी मंत्री पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. दरम्यान, वैजनाथ देवल कमिटीच्यावतीने सचिव राजेश देशमुख यांनी यासर्वांचे शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत केले. मंदिर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.
वैद्यनाथ मंदिर कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीमुळे गेल्या सतरा महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या यावेळी रोडावली आहे. श्रावण महिन्यात तरी मंदिर उघडतील अशी भाविकांची अपेक्षा होती. राज्यातील अनेक निर्बंध उठविले. मात्र मंदिर उघडण्याचा शासनाने निर्णय घेतला नाही. त्यामुळे भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचेच्या पायरीचे दर्शन घेऊन समाधान मानले .
दुसऱ्या श्रावण सोमवारी प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायरीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भक्तांची गर्दी सुरू झाली. महिलांनी तीळ शिवामूठ पायरीवरच वाहीली तसेच बेलपत्र अर्पण केली. वैद्यनाथ मंदिर परिसरातील प्रति वैजनाथ मंदिर, संत जगमित्र नागा मंदिरात ही दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. पोलीस निरिक्षक हेमंत कदम, पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव सह पोलीस कर्मचाऱ्यांनी मंदिर परिसरात कडक बंदोबस्त ठेवला.