लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : नाफेडच्या मुंबई कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत तेथील संगणकीय प्रणाली साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ‘मेसेज’ पाठवणे बंद झाले आहे. तूर खरेदीसाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे याच काळात हा प्रकार घडल्याने शेतक-यांसमोर आणखी एक अडचण वाढली आहे.
नाफेड राज्यभर त्या-त्या ठिकाणच्या स्थनिक संस्थाच्या माध्यमांतून आधारभूत किंमतीप्रमाणे तूर खरेदी करत आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून खरेदी प्रक्रि या सुरू आहे. केंद्रावर तूर घालण्यासाठी संबंधित शेतक-याने सात बारा उतारा पीक पेरा आधार झेरॉक्स बँक खाते क्रमांकासह स्थनिक खरेदी केंद्रावर नोंदणी करायची त्यानंतर शेतक-यास तूर केंद्रावर आणण्यासाठी तारीख दिल्या जायची.
तसा मेसेज शेतक-यांच्या भ्रमणध्वनीवर दिला जायचा. ही प्रक्रिया मुंबई येथील नाफेड कार्यालयातून केली जायची, असे धोरण राबवल्याने खरेदीमध्ये संथगती राहिली मात्र काम शिस्तबद्ध झाले.आता केवळ दोन दिवस खरेदी सुरू राहणार आहे. मात्र मुंबई कार्यालयातील संगणकीय प्रणाली जळाल्याने ‘मेसेज’ बंद झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला.