निराधारांना आधार देणारा डाके कुटुंबियांनी स्तुत्य उपक्रम राबविला असल्याचे मत माजलगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रज्ञा माने यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील सोन्नाथडी येथे डाॅ. अजयसिंह डाके यांनी आयोजित नेत्रतपासणी शिबीर, पितृछत्र हरवलेल्या सात कुटुंबियांना आर्थिक मदत व शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात मंंगळवारी त्या बोलत होत्या. या शिबिरात दोनशे रुग्णांची नेत्रतपासणी मोफत करण्यात आली. अध्यक्षस्थानी ॲड. बी. आर. डक हे तर गटविकास अधिकारी प्रज्ञा माने, जय महेश कारखान्याचे उपाध्यक्ष गिरीश लोखंडे, दत्तात्रय आहेरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाते, डाॅ. अजयसिंह डाके, मिलिंद लगाडे, अंकुश राठोड यांची उपस्थिती होती. मागील वर्षभराच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या कारणाने कुटुंब प्रमुखांचे निधन झाले. अशा सात कुटुंबीयांना प्रत्येक पाच हजार रुपयांची आर्थिक मदत व शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मागील सात ते आठ वर्षांपासून डाॅ. डाके सामाजिक उपक्रम राबवितात. या कार्यक्रमास जिव्हाळा ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.