माजलगाव : तहसील कार्यालयाने वृद्ध, गरीब, अपंग, संजय गांधी, इंदिरा गांधी निराधार, वृद्धापकाळ अशा विविध योजनांतर्गत राज्य सरकारने वाटपासाठी दिलेले धनादेश व याद्या स्वीकारण्यास बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील शाखेकडून नकार दिल्याने मागील तीन महिन्यांपासून निराधारांची हेळसांड होत आहे.
तालुक्यातील गोरगरीब, अपंग, वृद्ध, निराधार लोकांना आधार मिळण्यासाठी शासनाची संजय गांधी, इंदिरा गांधी, वृद्धापकाळ योजना आहे. या योजनेत पात्र लोकांना आर्थिक मदत म्हणून शासन दरमहा पैसे देते. मात्र, या ठिकाणी दोन - तीन महिन्यात एकदा पैसे येतात. त्याचे वाटप विविध बँकांमार्फत करण्यात येते. फेब्रुवारी व मार्च महिन्यात तहसील कार्यालयाच्या वतीने भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, भारतीय पोस्ट खाते व जिल्हा मध्यवर्ती बँक या ठिकाणी तहसील कार्यालयाने पात्र लोकांच्या याद्या व रकमेचे धनादेश दिले. ते इतर सर्व बँकांनी स्वीकारून वाटपही केले. मात्र, येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तहसीलचा धनादेश व याद्या स्वीकारल्याच नाहीत. यापूर्वीचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी जिल्हा बँकेतील निराधारांची खाती बंद करून टाकण्याचे आदेश असल्याचा हवाला देत फेब्रुवारी व मार्च महिन्याचे धनादेश न स्वीकारल्याने निराधारांवर कोरोना व लॉकडाऊन काळात उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत तहसीलदार वैशाली पाटील यांनी बँक व्यवस्थापकांना फोन केला. परंतु त्यांनी उचलला नाही, असे सांगण्यात आले.
लेखी आदेश नसल्याचे कारण
यापूर्वीचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील निराधारांचे खाते बंद करून राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडावे, असे आदेश दिले होते. मात्र, वृद्धांच्या हातांचे ठसे उमटत नसल्याने नवीन खाते उघडत नाहीत, अशी अडचण निर्माण झाल्याने याविरुद्ध लोकांनी आंदोलने केली. म्हणून पुन्हा या बँकेच्या मार्फत पैसे देण्यात येत होते. मात्र, जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांनी लेखी दिले नसल्याने त्याचा आधार घेऊन येथील व्यवस्थापक तहसीलदारांचे आदेश डावलत असल्याचे दिसून येत आहे.
बँकेच्या अधिकाऱ्यांकड विचारणा करू
तहसील कार्यालयाकडून फेब्रुवारीमध्ये २ हजार ६९७ लाभार्थ्यांना वाटपासाठी ३ लाख ५७ हजार रुपये, तर मार्च महिन्यात २ हजार ४२५ लाभार्थ्यांना वाटपासाठी ७६ लाख ९२ हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले होते. जिल्हा बँकेच्या शाखाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले असून, याबाबत त्यांना विचारणा करण्यात येईल व याबाबतचा प्रश्न तत्काळ सोडवण्यात येईल.
- वैशाली पाटील, तहसीलदार, माजलगाव