बीड : उपचार व सुविधांबाबत सामान्यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगणारे अधिकारीच आता स्वता:च्या यंत्रणेवर अविश्वास दाखवित आहेत. कोवीड रुग्णालयाचे प्रमुख असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यालाच कोरोनाची बाधा झाल्याने त्यांनी अवघे काही तास जिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन नंतर औरंगाबादेतील खाजगी रुग्णालय गाठले. ते रेफर झाल्यामुळे येथील उपचाराबद्दल आता खरोखरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
जिल्हा रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यांनी तात्काळ कोरोना तपासणी केली असता त्यात ते पॉझिटिव्ह आले. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयातीलच आयसीयू विभागात दाखल केले. अवघे काही तास त्यांनी येथे उपचार घेतल्यानंतर औरंगाबादचा रस्ता धरला. कोविड रुग्णालयाचे प्रमुख आणि इतरांना सर्व सुविधा दिल्या जातात, उपचार वेळेवर मिळतात, सामान्यांच्या तक्रारी बिनबुडाच्या आहेत, असे सांगणारे अधिकारीच आता औरंगाबादला गेले आहेत. त्यांनी सरकारी यंत्रणेवर पूर्णपणे अविश्वास दाखविला आहे. प्रकृती चिंताजनक सांगून रेफर झाले तर ते औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात का गेले नाही? खाजगी रुग्णालयात का गेले? ज्या यंत्रणेचे प्रमुख आहेत, त्याच यंत्रणेवर त्यांचा विश्वास नाही का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या अधिकाऱ्याने स्वता: जिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन सामान्यांच्या मनात सरकारी यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करून देण्याची गरज होती. परंतु त्यांनी पूर्णपणे अविश्वास दाखवित औरंगाबाद गाठल्याने सामान्यांमधून चर्चेला उधान आले आहे. याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याला भ्रमणध्वणीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु फोन नॉट रिचेबल होता.सुविधा, उपचारांबद्दल तक्रारींचा ढिगाराजिल्हा रुग्णालयात सुविधा नाहीत, वेळेवर उपचार मिळत नाहीत, जेवण दर्जेदार नाही, डॉक्टर, परिचारीका, कर्मचारी लक्ष देत नाहीत, अशा तक्रारी वारंवार पुढे येत आहेत. परंतु या तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचा दावा प्रत्येकवेळी आरोग्य विभागाकडून केला जातो. या सर्व तक्रारी खोट्या असतील किंवा त्यात तथ्य नाही तर स्वत: अधिकारी औरंगाबादला का गेले? त्यांनी बीडमध्ये का उपचार घेतले नाहीत? असा सवाल उपस्थित होत आहे.
अनेक सरकारी डॉक्टर जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. एक अधिकारी औरंगाबादला गेले आहेत, हे खरे आहे. यावर आताच बोलणे उचित नाही. लवकरच यावरही प्रतिक्रिया दिली जाईल. - डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक बीड