बीड : जिल्हा रुग्णालयात डॉक्टर ओपीडीत बसत नाहीत, कोरोन वॉर्डमध्ये वेळेवर राऊंड होत नाहीत, याबाबत तक्रारी होत्या; परंतू जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी स्वत: चार वेळा राऊंड घेतला. यात सर्व डॉक्टर तर ओपीडीत बसलेच होते, शिवाय कोरोना वॉर्डमध्येही वेळेवर राऊंड होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रुग्ण व नातेवाइकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
कोरोना महामारी आल्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीतील ओपीडी व आयपीडीसह इतर सर्व विभाग आदित्य महाविद्यालयाच्या इमारतीत स्थलांतरित केले. परंतु मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या नावाखाली इकडे डॉक्टर फिरकतच नव्हते. तसेच ओपीडीमध्येही ते थांबत नसल्याने रुग्णसंख्या घटली होती. हा प्रकार समजताच नूतन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी स्वत: राऊंड घेतला. उशिरा येणाऱ्यांना तंबी दिली. गुरुवारी राऊंड घेतला असता सर्व डॉक्टर हजर दिसले. असाच प्रकार कोरोना वॉर्डमध्ये होता. येथेही डॉक्टर वेळेवर जात नव्हते. दोन वाॅर्डसाठी एकच डॉक्टर होते. हा प्रकार डॉ. साबळे यांना राऊंडमध्ये दिसला. त्यांनी यात सुधारणा करीत प्रत्येक वॉर्डला एक डॉक्टर उपलब्ध करून दिला. बुधवारी रात्री राऊंड घेतला असता सर्व डॉक्टर हजर दिसले. त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच रुग्ण व गंभीर रुग्णांसोबत असलेल्या नातेवाइकांशीही संवाद साधत प्रतिक्रिया घेतल्या. काही त्रुटी समजताच यात तत्काळ सुधारणा करण्यात आली. कारभारात पूर्वीपेक्षा काही प्रमाणात सुधारणा होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
स्वत: ओपीडी काढल्याने फायदा
कारभार हाती घेतल्यानंतर स्थलांतरित रुग्णालयातील नॉन-कोविड ओपीडी स्वत: डॉ. सुरेश साबळे यांनी काढली. त्यामुळे इतर सर्व डॉक्टर आता पूर्णवेळ ओपीडीत बसून सेवा देत आहेत. याचा फायदा सामान्यांना होत आहे.
स्वच्छतेत सुधारणा आवश्यक
वर्षभरापासून रुग्णालयाचे स्थलांतर झालेले आहे. परंतु स्वच्छतेचा मुद्दा अद्यापही मार्गी लागलेला नाही. वॉर्डबॉय व कक्षसेवक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. तसेच वॉर्ड इन्चार्जही स्वच्छता करून घेत नसल्याने रुग्णांना घाणीचा सामना करावा लागत आहे. यात सुधारणा करण्याची मागणी होत आहे.
---
मी स्वत: राऊंड घेतले आहेत. काही त्रुटी रुग्ण व नातेवाइकांशी संवाद साधल्यानंतर समजल्या. यात तत्काळ सुधारणा करण्यात आली आहे. विद्युत व्यवस्थेसंदर्भातील प्रश्न आठवडाभरात मार्गी लागलेल्या दिसतील. स्वच्छतेसाठी आता विशेष समिती नियुक्त करून रोज आढावा घेतला जाईल.
- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड