डॉक्टरांना सुट, रूग्णांची लुट; बीड जिल्हा रूग्णालयात व्यसनमुक्तीच्या कारवाईत दुजाभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 04:21 PM2018-11-29T16:21:54+5:302018-11-29T16:26:25+5:30
जिल्हा रूग्णालय किंवा परिसरात तंबाखुजन्य पदार्थ खाणाऱ्यास दंड आकारला जात आहे.
बीड : जिल्हा रूग्णालय किंवा परिसरात तंबाखुजन्य पदार्थ खाणाऱ्यास दंड आकारला जात आहे. मात्र येथे कारवाईत दुजाभाव केला जात असून रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना सुट देऊन सर्वसामान्य रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून दंड आकारला जात आहे. केवळ कारवाईचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी तंबाखु नियंत्रण विभागाकडून हा प्रकार केला जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तंबाखुजन्य पदार्थ खाऊन रुग्ण नातेवाईकांसह रुग्णालयात कार्यरत डॉक्टर व इतर कर्मचारी भिंतीवर थुंकतात. त्यामुळे जिल्हा रूग्णालयातील प्रत्येक भिंत पिचकऱ्यांनी रंगीबेरंगी झालेली दिसते. हे टाळण्यासाठी व स्वच्छता रहावी, तसेच नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे या उद्देशाने रुग्णालय व परिसरात तंबाखुजन्य पदार्थ खाणाऱ्यावर कारवाई केली जाते. त्यांच्याकडून दंडही वसूल केला जातो.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पथक नियुक्त केले असून, त्यांच्याकडून कारवाईत दुजाभाव होत असल्याचे बुधवारी समोर आले आहे. डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना बगल देत केवळ गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून दंड वसूल केला जात असल्याचे समोर आले आहे. पथकाच्या या दुजाभावामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता याच पथकाची चौकशी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. काही नागरिकांनी याबाबत तक्रारी करणार असल्याचे सांगितले.
जनजागृती कागदावरच
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनापासून मुक्त होण्यासाठी जनजागृती करण्याचे आदेश आहेत. मात्र, जिल्हा रुग्णालयातील विभाग केवळ कागदोपत्री जनजागृती दाखवत आहे. प्रत्यक्षात मात्र कसलाच रिझल्ट नसल्याचे समोर आले आहे.
म्हणे...डॉक्टरांवर कारवाईचे अधिकार नाहीत !
डॉक्टरांवर कारवाई अधिकार नाहीत असे कारण सांगत संबंधित अधिकाऱ्यांनी डॉक्टरांची बाजू घेतली. हेच डॉक्टर सध्या भिंती रंगवत आहेत. अधिकाऱ्याच्या या दुजाभावामुळे संशय व्यक्त होत असून, दोघांमध्ये संगनमत असल्याचा आरोप केला जात आहे.
एका दिवसात केवळ १६ कारवाया
बुधवारी ६ ते ७ लोकांचे पथक कारवाईसाठी फिरत होते. दिवसभरात केवळ १६ कारवाया करुन ६५० रुपयांचा दंड वसूल केला. यातील १२ कारवाया या सर्वसामान्यांवर होत्या. उर्वरित ४ कारवाया वर्ग - ४ च्या कर्मचाऱ्यांवर झाल्या. यामध्ये एकाही डॉक्टराचा समावेश नाही हे विशेष. यावरुन पथकाकडून होणारा दुजाभाव दिसून येतो.
कोणालाही सुट नाही
रुग्णालयात राऊंड घेताना मी स्वत: कारवाया केलेल्या आहेत. तसेच जनजागृतीही केली जाते. रुग्ण, नातेवाईक असो अथवा डॉक्टर, कर्मचारी यापैकी कोणालाही सूट दिली जाणार नाही. दुजाभाव न करता सर्वांवर कारवाई केली जाईल. तसे आदेश दिले जातील. नागरिकांनीही सहकार्य करावे.
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड