अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती रुग्णालयात डॉक्टरांची रुग्णासोबतच दिवाळी; पाच दिवसात झाल्या ६४ सिझर व १२७ प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 05:37 PM2018-11-14T17:37:28+5:302018-11-14T17:38:25+5:30
हक्काच्या दिवाळीच्या सुट्या असतांनाही सामाजिक भान जागृत ठेवत स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभागातील डॉक्टरांनी आपली दिवाळी रुग्णालयातच रुग्णांसोबत साजरी करत सेवा दिली.
अंबाजोगाई (बीड ) : हक्काच्या दिवाळीच्या सुट्या असतांनाही सामाजिक भान जागृत ठेवत स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभागातील डॉक्टरांनी आपली दिवाळी रुग्णालयातच रुग्णांसोबत साजरी करत सेवा दिली. दिवाळीच्या पाच दिवसांच्या कालावधीत ६४ महिलांचे सिझर व १२७ महिलांच्या प्रसुत्या झाल्या. तर दोन अत्यवस्थ महिलांची श्सत्रक्रिया करून जीवदान देण्यात आले. ही सर्व कामगिरी स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
दिवाळीचा सण व सुट्या हे सर्वांसाठी समीकरण दृढ झालेले आहे. आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात अनेकजण धन्यता मानतात. मात्र स्वा.रा. ती. रुग्णालयातील स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभागातील डॉक्टरांनी आपल्या संवेदना जागृत ठेवून रुग्णसेवेला प्राधान्य दिले. दिवाळीच्या कालावधीत अंबाजोगाई शहर व परिसरातील तालुक्यांमध्ये खाजगी दवाखाने बंद राहिले. हा सर्व भाग स्वा. रा. ती. रुग्णालयांवरच पडला. अशा स्थितीत6 रुग्णसेवा महत्त्वाची समजून या विभागातील डॉक्टरांनी स्वत:च्या हक्काच्या सुट्या सोडून दिल्या व रुग्णालयात या कालावधीत ६४ महिलांचे सिझर, १२७ महिलांची प्रसुती तर दोन अत्यवस्थ महिलांच्या अवघड शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान दिले. सुटीच्या कालावधीत डॉक्टरांनी केलेली ही कामगिरी गौरवास पात्र ठरली आहे.
या सर्व कामगिरीसाठी डॉ. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. मिताली गोलेच्छा, डॉ. वर्षा करपे, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. कल्याणी मुळे, डॉ. पूनम देसाई, डॉ. अर्चना पारसेवार, डॉ. प्रियंका खरोने, डॉ. सिद्धार्थ नामपल्ले, डॉ. प्रियंकासिंह दासिला, डॉ. अभिजित पाटील, डॉ. पुष्पदंत रुग्णे, डॉ. गौरव पुरळकर, डॉ. सुभाष राठोड, डॉ. करमजित डोंगरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून सुट्यांवर पाणी सोडत रुग्णसेवेला प्राधान्य दिले. डॉक्टरांनी दाखविलेल्या या उपक्रमाबद्दल अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, अधीक्षक डॉ. राकेश जाधव यांनी स्वागत केले आहे.